आगीची सूचना देणारा भोंगा नाही, सुरक्षा रक्षकांजवळ ‘वॉकीटॉकी’ही नाहीत !

पुणे – भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काय सिद्धता केली पाहिजे ? काय दक्षता घेतली जावी ? यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतींमध्ये ‘मॉक ड्रील’ (मॉक ड्रील म्हणजे आपत्कालीन सराव) घेण्यात आले. यात अचानक आग लागली, तर सर्वांना सूचना मिळावी, यासाठीचा भोंगा नसल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी ‘वॉकीटॉकी’ (फिरता भ्रमणभाष) नसल्याचे समोर आले, तर अग्नीशमन यंत्रणाही योग्य पद्धतीने कार्य करत नाही. महापालिकेच्या मुख्य भवनाच्या इमारतीमध्ये ७ मे या दिवशी दुपारी ४ वाजता ‘मॉक ड्रील’ घेण्याचे आदेश होते. यामध्ये नागरी संरक्षण दल, अग्नीशमनदल, वैद्यकीय अधिकारी, पोलीस विभाग, महापालिकेचा सुरक्षा विभाग, तसेच संकट व्यवस्थापन विभाग यांनी सहभाग घेतला होता.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ‘मॉक ड्रील’ विषयी सर्व उपस्थित कर्मचारी, अधिकारी, तसेच महापालिकेत कामानिमित्त आलेल्या नागरिकांना सविस्तर माहिती दिली. या वेळी काही यंत्रणा काम करत नसल्याचे दिसून आले. या सर्व यंत्रणांची पडताळणी करून त्रुटी दूर केल्या जातील, असे दिवटे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :‘मॉक ड्रील’ प्रसंगी ‘स्मार्ट सिटी’ म्हणवणार्या पुणे महापालिकेच्या अनेक त्रुटी असतील, तर अन्य जिल्ह्यांची काय स्थिती असेल ? |