‘पॉप कॉर्न’ (मक्याच्या लाह्या), म्हणजेच ‘पॉप कॉर्न’सारखे तांदुळाला ‘पॉप’ (फट आवाज करणे) केले की, बनतो ‘पॉप्ड राईस’, म्हणजेच आपल्या साळीच्या लाह्या बनतात. उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असतांना उपयोगी अशा लाह्यांविषयी जाणून घेऊया.

१. साळीच्या लाह्यांचा उपयोग
सध्या दिसणार्या लक्षणात पित्त होणे, पोट जड होणे, भूक मंदावणे, थकवा, गळून गेल्यासारखे वाटणे, पोटात आग पडणे, अशक्तपणा ही लक्षणे नवीन नाहीत. जेव्हा पचनही कमी असते आणि थकवा मात्र पुष्कळ असतो, अशा स्थितीत साळीच्या, म्हणजेच तांदुळाच्या लाह्या या देवदूतच. साळीच्या लाह्या, म्हणजे दिवाळीच्या काळात घरात लक्ष्मीपूजन करतांना ज्या वापरतात, त्या लांबट आकाराच्या अशा तांदुळाच्या लाह्या.

२. लाह्यांचे गुण
लाह्या पचायला हलक्या, थंड; परंतु अग्नी वाढवणार्या आहेत. अंगातील जडपणा, उष्णता न्यून करायला साहाय्य करतात. तहान, जुलाब, वजन वाढ, उलटी, खोकला हे विकार न्यून करणार्या आहेत. प्रत्यक्ष रुग्णांमध्ये या लाह्या चक्कर येणे, उन्हाळ्यात घुळणा फुटणे, कोठा हलका असणे, भूक न्यून लागणे या त्रासांमध्ये दिल्या जातात.
३. लाह्यांचे पदार्थ
अ. लाह्याचे पीठ, खडीसाखर / गूळ आणि पाणी हे एकत्र उकळून शिजवून ताप आला असता लापशी पद्धतीत भुकेचा अंदाज घेऊन देता येते.
आ. लाह्या १४ पट पाण्यात भिजवून थोडी उकळी आणून त्याचे पाणी गार करून खडीसाखर घालून जुलाब, उलटी, अशक्तपणा, तहान तहान होणे, चक्कर या सर्व लक्षणांत उपयोगी ठरते.
इ. लहान मुलांना अंगावरच्या दुधापासून सोडवतांना लाह्यांचे पीठ, मध, ज्येष्ठमध, मनुका यांनी बनवलेला लाडू त्यांना देता येतो.
ई. वयस्कर व्यक्तींना भाजलेले लाह्यांचे पीठ, थोडी कणीक, खोबरे, खसखस, डिंक असा पौष्टिक लाडू देता येतो. विशेषतः थंडीमध्ये थोड्या भुकेला आणि लहान मुलांना छोट्या डब्यात द्यायला चांगला पर्याय आहे.
उ. उन्हाळ्यात फार भूक लागत नसतांना दूध किंवा ताक यांसह लाह्या अथवा त्यांचे पीठ देता येते.

ऊ. उन्हातून आल्यावर जर थकवा, चक्कर, खायची इच्छा नसणे, अशी लक्षणे असता लाह्या, खडीसाखर / गूळ आणि पाणी किंवा दूध एकत्र शिजवून लापशीसारखे बनवून खायला देता येईल. थंड असल्याने लक्षणे न्यून करतात आणि स्वभावाने हलक्या असल्याने अल्प भूक असतांना कामाला येतात.
ए. सकाळी उठल्या उठल्या भूक लागत असेल किंवा आग पडल्यासारखे होत असेल, तर तुपावर भाजलेल्या लाह्या खाव्यात.
ऐ. लाह्या घरात डब्यात साठवून ठेवू शकता येतात. ओलसरपणा असेल, तर लाह्या पोखरून त्यात पोरकिडे होऊ शकतात. भाजून गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवाव्यात. त्या भरपूर दिवस टिकतात. लहान मुलांना अशा पद्धतीत भाजून ठेवलेल्या लाह्या या मधल्या वेळचे खाणे म्हणून देता येतात.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
उन्हाळ्यात त्वचेला येणारा कोरडेपणा आणि होणारी पायदुखी न्यून करण्यासाठी तेल लावा !आपल्या मुलांच्या पायाला आपण पोहून अथवा खेळून आल्यावर तेल लावत आहात ना ? त्यांच्या पायाला तेल लावत असतांना थोडेसे तेल स्वतःच्या पायाला लावायलाही विसरू नका. उन्हाळ्यात त्वचेला येणारा कोरडेपणा आणि होणारी पायदुखी न्यून करण्यासाठी उपयोगी ठरेल, लहान मुलांनाही आणि त्यांच्या मागे धावणार्या तुम्हालाही ! – वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये |