|

शेवगाव (प्रतिनिधी) – येथील गुरुदत्त सामाजिक, शैक्षणिक आणि कला आणि क्रीडा संस्थेच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कार घोषित झाले असून यंदाच्या ‘आध्यात्मिक कार्य गौरव’ पुरस्कारासाठी श्रीक्षेत्र भालोद, (गुजरात) येथील श्रीदत्त मंदिराचे महंत प.पू. शरदचंद्र प्रतापे महाराज आणि देऊळगाव राजा, (जिल्हा बुलढाणा) येथील जगदंबाभक्त प.पू. प्रा. मुकुंदनाथ आंधळे यांची, तर ‘सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कारासाठी डॉ. गौतम काळे (अहिल्यानगर), डॉ. दिनेश झिरपे आणि डॉ. अभिजीत बाहेती (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे, याची माहिती अध्यक्ष अर्जुनराव फडके आणि सचिव फुलचंद रोकडे यांनी दिली. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी ११ सहस्र रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प.पू. दादाजींच्या १०६ व्या जयंतीदिनी बुद्ध पौर्णिमेला, म्हणजेच १२ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ४ वाजता दत्त देवस्थानच्या दादाजी प्रसादालयात नाशिकचे प.पू. गजानन कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुळशी (जिल्हा पुणे) येथील किमया आश्रमाचे १३३७ वे पिठाधीश प.पू. श्री स्वामी कृष्ण चैतन्य यांच्या शुभहस्ते आध्यात्मिक पुरस्काराचे तर, आमदार मोनिका राजळे अन् माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते सामाजिक कार्य गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन श्री. फडके आणि श्री. रोकडे यांनी केले आहे.