पळशी (तालुका बारामती) ग्रामसेवक लाच घेतांना कह्यात !

बारामती (जिल्हा पुणे) – ठेकेदाराचे देयक काढण्याच्या बदल्यात ३० सहस्र रुपयांची मागणी करून २५ सहस्र रुपये लाच स्वीकारणारा पळशी (तालुका बारामती) येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. कांता काळाणे (वय  ५७) असे कह्यात घेतलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअन्वये गुन्हा नोंद केला आहे. शासकीय ठेकेदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारदार हे अनुमतीधारक ठेकेदार असून त्यांनी पळशी ग्रामपंचायत हद्दीत पाणी साठवण सिमेंट बंधार्‍याचे काम केले होते. या कामाचे देयक संमत होण्याकरता ग्रामसेवकाने लाच मागितली. पळशी गावाच्या हद्दीत काळाणे यांना लाच घेतांना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल भोसले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था कधी सुधारणार ? लाचखोरांवर कठोर कारवाई केव्हा होणार ?