छत्रपती संभाजीनगर येथे अभियंत्याला पैसे देण्यासाठी गेवराई पायगाच्या सरपंचाचे ‘भीक मागो आंदोलन’ !

फुलंब्री तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि पोलीस चौकी बाहेर आंदोलन करतांना सरपंच मंगेश साबळे

छत्रपती संभाजीनगर – विभागीय आयुक्ताच्या नावाने भीक मागत सरपंच मंगेश साबळे यांनी ८ मे या दिवशी जिल्ह्यातील फुलंब्री तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि पोलीस चौकीच्या बाहेर आंदोलन केले आहे. ‘विविध योजनांतील लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत, त्यांना तात्काळ रक्कम द्यावी, घरकुलासाठी पैसे मागणार्‍या अभियंत्याला पैसे देण्यासाठी आपण ‘भीक मागो’ आंदोलन करत आहोत’, असे त्यांनी म्हटले आहे. (पैसे मागणार्‍या भ्रष्ट अभियंत्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत ? अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना पाठीशी घातल्यामुळे भ्रष्टाचाराचा भस्मासुर वाढत आहे. – संपादक)

सरपंच मंगेश साबळे यांनी आंदोलन करतांना फाटलेले कपडे, तुटक्या चपल्या, पाठीवर आसंदी बांधलेली होती. एखाद्या भिकार्‍याप्रमाणे त्यांनी कपड्यांची वेशभूषा केली होती. साबळे हे आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी त्यांनी आपली कार जाळली होती. तेव्हापासून ते चर्चेमध्ये आले आहेत.

मंगेश साबळे म्हणाले की, फुलंब्री पंचायत समितीच्या वतीने राबवल्या जाणार्‍या वैयक्तीक सिंचन विहीर, गाय गोठा, घरकुल योजनाच्या कामांचे पैसे मागील ६ महिन्यांपासून मिळत नसल्याने शेतकरी, लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे. जमा झालेली रक्कम आणि (आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांवर अग्नीसंस्कार केल्यानंतर) स्मशानातील राख घेऊन ते प्रांत कार्यालयासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अभियंता आणि पोलीस अधीक्षक यांना देणार आहे.

संपादकीय भूमिका

  • केवळ प्रतिकात्मक आंदोलने करण्यापेक्षा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षा होण्यास भाग पाडले पाहिजे !
  • भ्रष्टाचाराने पोखरलेली शासकीय यंत्रणा !
  • शासकीय कार्यालयात पैसे दिल्याविना काम होत नसल्याने सरपंच मंगेश साबळे यांनी ‘भीक मागो’ आंदोलन केले आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या विरोधात आता लोकांनी संघटित होऊन भ्रष्टाचारी अभियंता, कर्मचारी आणि अधिकारी यांना जाब विचारला पाहिजे.