भावपूर्ण आणि उत्साहात शेकडो ग्रामस्थांनी काढली नूतन मंदिराच्या कलशाची शोभायात्रा !

कोतवडे, ८ मे (वार्ता.) – कोतवडे गावची स्वयंभू आणि जागृत ग्रामदेवी श्री महालक्ष्मीदेवीच्या नूतन मंदिराच्या कलशांची शोभायात्रा समस्त कोतवडेवासियांनी मोठ्या उत्साहात काढली. चित्ररथ, पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करत ग्रामस्थ मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभागी झाले होते. श्री महालक्ष्मी मंदिरापासून ते सनगरेवाडीमधील चिखलबावपर्यंत आणि पुन्हा मंदिरापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली.

श्री महालक्ष्मीदेवीचा जयघोष करत शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत ठिकठिकाणी भगवे ध्वज, प्रत्येक वाडीतील महिला आणि पुरुष यांनी समान परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले. या शोभायात्रेत प्रारंभी ढोलपथक, उंबरवाडीतील ग्रामस्थांनी वाघासह देवी असलेला चित्ररथ, महिलांचे लेझीम पथक सहभागी झाले होते.

कुंभारवाडीतील ग्रामस्थांनी संत गोराकुंभार आणि श्री विठ्ठलाची प्रतिमा असलेला विशेष चित्ररथ साकारला होता. गावणवाडी येथील महिला डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. सनगरेवाडीतील ग्रामस्थांनीही चित्ररथ साकराला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झालेले श्री. सुनील डाफळे आणि प्रभु श्रीरामांच्या वेशातील बालक हे सर्वांचे आकर्षण ठरत होते.

कलशाचे वैशिष्ट्य !
सकाळी मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये कलशांचे पूजन करण्यात आले. गर्भगृहावरील आणि मंदिराच्या सभागृहावरील असे दोन्ही कलश शोभायात्रेमध्ये रथात ठेवण्यात आले होते. हे दोन्ही कलश ओतीव पितळेचे आहेत.

विशेष –रथयात्रेच्या प्रारंभी रिमझिम पाऊस चालू झाला. मुसळधार पाऊस पडण्याची लक्षणे दिसू लागली; मात्र प्रत्यक्षात शोभायात्रा संपेपर्यंत पाऊस आला नाही. |

सर्व ग्रामस्थांचा सेवेत भक्तीभावपूर्वक सहभाग !
सकाळी ६.३० वाजल्यापासून मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. गावणवाडीमधील ग्रामस्थांनी मंदिराच्या मुख्यद्वाराला तोरण बांधले.

मंदिराला फुलांनी सजवणे, रांगोळी घालणे, धार्मिक विधींची सिद्धता करणे, आदी विविध सेवेत गावातील सर्व वाड्यांमधील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सकाळी मंदिरामध्ये संप्रोक्षणविधी पार पडला.

सायंकाळी राक्षोघ्नयाग पार पडला. वेदमूर्ती प्रभाकर जोगळेकर, मंदार घारपुरे, विजयानंद वझे आदी पुरोहितांनी मंदिरांतील सर्व धार्मिक विधी केले.