सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यावर साधकांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी ‘श्री महालक्ष्मीदेवीच समोर उभी आहे आणि त्यांच्या मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले शेषनागावर निद्रावस्थेत आहेत’, असे दिसणे !

‘रामनाथी आश्रमात आल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन झाले. मी कोल्हापूर येथे रहातो. त्यामुळे नवरात्रीत श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतो. आश्रमात आल्यानंतर पिवळ्या रंगाच्या तशाच प्रकारच्या साडीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहिले. तेव्हा ‘श्री महालक्ष्मीदेवीच माझ्यासमोर उभी आहे आणि त्यांच्यामागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले शेषनागावर निद्रावस्थेत आहेत’, असे मला दिसले. मी श्री महालक्ष्मीदेवीला मूर्तीमध्ये पहात होतो, तर ती श्री महालक्ष्मीदेवी मला प्रत्यक्षात येथे दिसली. तेव्हा ‘प्रार्थना केल्यानंतर कशी अनुभूती येते !’, हे मला कळले. पूर्वी मला अशी अनुभूती येत नव्हती. केवळ ‘नामजप करायचा आहे’, एवढेच माझ्या लक्षात होते. आता असे प्रयत्न वाढत आहेत.’
– श्री. सिद्धेश बराले, कोल्हापूर
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी त्यांच्या ठिकाणी पांढरा प्रकाश दिसणे आणि त्या प्रकाशात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचेही दर्शन होणे
‘रामनाथी आश्रमात आल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांच्या ठिकाणी मला पांढरा शुभ्र प्रकाश दिसला. त्याच पांढर्या प्रकाशात मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दिसले. नंतर तो प्रकाश वाढत गेला.’
– कु. अवंती उरकुडे, चंद्रपूर, महाराष्ट्र.
३. देवाला शोधण्यासाठी हाक मारतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि त्यांच्यापुढे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रत्यक्ष दर्शन होणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सभागृहात आल्या. तेव्हा कु. प्रणिता भोर या साधिकेने भावजागृतीसाठी एक प्रयोग घेतला. तिने डोळे बंद करायला सांगितले. तेव्हा असे वाटत होते, ‘आता डोळे उघडायलाच नकोत.’ ताईने सांगितले, ‘‘आनंदाची बातमी आहे’’, तरी मला ‘माझे डोळे उघडूच नयेत’, असे वाटत होते. त्या वेळी ‘माझ्यासमोर पुष्कळ प्रकाश आहे’, असे मला वाटत होते आणि तो मी पाहू शकत नव्हतो. तेव्हा मला आतून आवाज ऐकू आला, ‘कृष्णा, आम्ही सगळे आलो आहोत. तू कुठे आहेस ?’ मी डोळे उघडले, तर मला माझ्या समोरच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्या. रात्री झोपतांना माझ्या मनात आले, ‘हे कृष्णा,
तू अजून मला भेटला नाहीस’ आणि दुसर्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. तेव्हा मला एवढी कृतज्ञता वाटली, ‘त्यांच्याच कृपेने आम्ही सर्व जण पुढे जात आहोत.’ त्यामुळे पुष्कळ आनंद मिळत आहे. कृतज्ञता गुरुदेव !’
– श्री. साहिल बोबडे, वर्धा, महाराष्ट्र.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |