‘ऑपरेशन अभ्यास’

पणजी – देशभर नागरी सुरक्षेच्या अनुषंगाने ‘ऑपरेशन अभ्यास’ या नावाने ‘मॉक ड्रिल’ पार पडले. संपूर्ण भारतात २५९ ठिकाणी झालेल्या या उपक्रमात गोव्यातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांचा आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश होता.
उत्तर गोवा
उत्तर गोव्यातील इंडियन नॅशनल वॉटर स्पोर्ट्स सेंटर, मिरामार; पणजी फेरी घाट; गोवा ग्लास फायबर लि., कोलवाळ, बार्देश येथे पार पडला. पणजी फेरी घाट येथे मांडवी पूल कोसळल्याची कल्पित परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. यामध्ये शोध आणि बचाव कार्य, लोकांचे स्थलांतर, मोठ्या प्रमाणातील घायाळ नागरिकांचे व्यवस्थापन आदींचा समावेश होता. यामध्ये नागरी सुरक्षा स्वयंसेवकांनीही सक्रीय सहभाग घेतला.
या कार्यवाहीचे निरीक्षण उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती यशस्विनी बी. (IAS) यांनी केले. पोलीस, अग्नीशमन, आरोग्य सेवा, नॅशनल कॅडेट कोर, राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि अन्य संबंधित यंत्रणांनी या सरावात सहभाग घेतला. सिद्धता आणि समन्वय पडताळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
दक्षिण गोवा
दक्षिण गोव्यात मुरगाव येथे इंडियन ऑईल कंपनी लिमिटेडच्या बंदराजवळ सराव करण्यात आला. या वेळी आग लागल्यास ती कशी विझवावी याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

सावंतवाडी – ‘युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीतकमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि साहाय्य पोचवण्यासाठी दक्षता म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच वेळी ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले. या वेळी सादर करण्यात आलेली विविध प्रात्यक्षिके सर्वांनाच उपयोगी पडतील’, असे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘मॉक ड्रिल’च्या समारोपाच्या वेळी सांगितले. या वेळी अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी उपस्थित होते. या वेळी केंद्रीय संरक्षण दल, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, अग्नीशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्र यांच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे ? आणि काय करू नये ? याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
दुपारी ४ वाजता सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, तिलारी प्रकल्प, तसेच ग्रामीण भागातही ‘मॉक ड्रिल’ पार पडले.
सावंतवाडी येथे नगरपरिषदेद्वारे वाजवण्यात आलेल्या ‘भोंगा’ (सायरन) वाजवण्यात आला. आवाज वरखाली होणारा भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर बाजारपेठ परिसर निमर्नुष्य झालेला पहायला मिळाला. ‘मॉक ड्रिल’मुळे नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत घ्यायच्या काळजीविषयी जागरूकता निर्माण झाली’, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.