श्री लईराईदेवीच्या कौलोत्सवाला पोलीस बंदोबस्तात प्रारंभ

डिचोली, ६ मे (वार्ता.) – शिरगाव येथील श्री लईराईदेवीचा कौलोत्सव गेल्या ४ दिवसांपासून चालू आहे. कौलोत्सवाच्या ६ मे या शेवटच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा नेमण्यात आला होता. ६ मे या दिवशी सायंकाळपर्यंत गर्दी नियंत्रणात होती. सायंकाळपर्यंत बहुतेक घरांमध्ये कौलोत्सव कोणत्याही अडथळ्याविना चालू होता.

पुढील काही दिवसांत येणार सत्यशोधन समितीचा अहवाल ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी – शिरगाव येथील श्री लईराईदेवीच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणी सरकारस्थापित महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल सरकारला अजून प्राप्त झालेला नाही. अहवाल सिद्ध होण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले,‘‘साक्ष नोंद केल्यानंतर घटनास्थळाची स्थिती आणि इतर आवश्यक गोष्टी यांचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी वेळ लागणार आहे.’’

चेंगराचेंगरीला विद्यमान समितीच उत्तरदायी ! – गणेश गावकर, माजी अध्यक्ष

शिरगाव येथील जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीला श्री लईराई देवस्थानची विद्यमान समितीच उत्तरदायी आहे. याला समितीचे विद्यमान अध्यक्ष दिनानाथ गावकर हे उत्तरदायी आहेत. विद्यमान देवस्थान समिती व्यवस्थेला अनुसरून प्रशासकांना अजिबात विश्वासात घेत नाही, असा आरोप श्री लईराई देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी केला आहे.