वक्फ मालमत्तांची नोंदणी आता ऑनलाईन होणार !

नागपूर – राज्यातील वक्फ मालमत्तांचे नोंदणीकरण लवकरच पूर्णपणे ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार आहे. यासाठी वक्फ बोर्डाने नव्या कायद्यानुसार एक विशेष पोर्टल सिद्ध केले असून त्याचा लवकरच शुभारंभ होणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून मालमत्तेची नोंदणी अवघ्या एका दिवसात पूर्ण होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) समीर काझी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की,

१.  नव्या कायद्यानंतर आता ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार असून संबंधित व्यक्तींना केवळ आवश्यक माहिती आणि कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत.

२. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया तात्काळ पूर्ण केली जाईल. महाराष्ट्रात वक्फच्या अंदाजे १ लाख कोटी रुपयांच्या मालमत्ता आहेत. त्यापैकी अनेक मालमत्तांची अद्याप नोंदणी झालेली नाही. ही प्रक्रिया आता गतीने पूर्ण केली जाईल.

३. नोंदणीनंतर या मालमत्तांचे व्यवस्थित व्यवस्थापन करता येईल आणि त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. या उत्पन्नाचा थेट लाभ मुसलमान समाजाला मिळेल.

४. मागील ८ महिन्यांत वक्फ बोर्डाला ११ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.  राज्यातील वक्फ मालमत्तांवर भविष्यात शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि इतर सामाजिक संस्थांची उभारणी करण्याचा बोर्डाचा मानस आहे.

कुणाच्या भूमी वक्फ बोर्डाने बळकावल्या आहेत, त्याची माहिती यातून समजेल. त्यामुळे हिंदूंनी सजग राहून त्यांच्या भूमीविषयी फसगत झाली असेल, तर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अथवा न्यायालयात तक्रार प्रविष्ट करून वक्फ बोर्डाने बळकावलेली भूमी संबंधित मालकांनी कह्यात घेतली पाहिजे !