
पुणे – आरोपी सुभाष शिवदास भोसले याने आयकर विभाग (इन्कमटॅक्स), भारतीय अन्न महामंडळ (फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया) आणि आयात विभाग (कस्टम डिपार्टमेंट) मध्ये नोकरी लावतो, असे सांगून ३६ लोकांकडून ४ कोटी ३७ लाख ३० सहस्र रुपये घेतले. काही आस्थापनांचे बनावट नियुक्तीपत्र आणि बनावट ओळखपत्र संबंधित लोकांना दिले. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा २०२४ मध्ये नोंद झाला होता. या प्रकरणी राजगुरुनगर येथील सत्र न्यायालयाने आरोपीस १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला आहे. आरोपीची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्याने कुणाचीही जाणीवपूर्वक फसवणूक केलेली नाही आणि आरोपीच्या विरोधात तसा प्रत्यक्ष पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नाही, असा युक्तीवाद आरोपीचे अधिवक्ता नीलेश वाघमोडे आणि महेश देशमुख यांनी केला. आरोपीच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत आरोपीस जामीन संमत करण्यात आला.