८ वर्षे होता पसार !

खालापूर (जिल्हा रायगड) – डोणवत येथे प्रशांत कांबळे नावाचा अंनिसचा कार्यकर्ता असणारा नक्षलवादी सुनील चंद्रकांत जगताप हे नाव धारण करून आणि याच नावाचे आधारकार्ड घेऊन रहात होता. ८ वर्षे पसार असणार्या या नक्षलवाद्याला आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. खानाव गावाच्या पत्त्यावर त्याचे आधारकार्ड असून त्याने मतदानही केले असल्याचे खालापूर गावचे सरपंच संदेश पाटील यांनी माध्यमांना सांगितले.
१. लॅपटॉप, दूरचित्रवाणीसंच, संगणक आदींच्या दुरुस्तीचे दुकान थाटून गेली ८ वर्षे नक्षलवादी कांबळे हा रायगड जिल्ह्यातील खालापूर या गावात रहात होता. तो जवळील आदिवासी पाड्यात मुलांना वह्या, खाऊ, गणवेश वगैरे वाटत असे, त्यांना शिकवत असे, तसेच अंनिसचे कार्य करत असे.
२. लोक त्याला ‘सर’ म्हणत असत. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो येथे सर्वांना ठाऊक होता. त्याने आजूबाजूच्या लोकांच्या मनात घर केले होते. येथील १३ ग्रामपंचायतींमध्ये त्याने संगणकदुरुस्तीचे इत्यादी काम केले होते.
३. खालापूर गावचे सरपंच संदेश पाटील म्हणाले, ‘‘आमच्या समवेत हा नक्षलवादी रहात होता, हे समजल्यावर आम्हाला धक्का बसला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तो सक्रीय सदस्य होता. आम्ही त्याला कुठे रहातोस वगैरे विचारले होते. तो पुणे-मुंबईला जाऊन संगणाकाच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य आणायचा. ३-४ दुकानांचे गाळे त्याने घेतले होते. त्याच्या कार्याच्या निमित्ताने प्रत्येक परिसरात तो जायचा. लोकही त्याचे स्वागत करायचे. ‘सेवा फाऊंडेशन’ या संस्थेने समाजोपयोगी कामे केल्याविषयी त्याला पुरस्कारही दिला होता. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत.’’
संपादकीय भूमिकाकाही वर्षांपूर्वी राज्य सरकारने नक्षलवादी संघटनांची सूची जाहीर केली होती. त्यामध्ये अंनिसचाही समावेश होता. त्यामुळे या संघटनेच्या कार्यकर्त्याला नक्षलवादी म्हणून अटक होणे, हा ही संघटना नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा पुरावा आहे ! अशा समाजविघातक संघटनेवर सरकार बंदी का घालत नाही ? |