BLA Killed Pakistani Solders : बलुच लिबरेशन आर्मीच्या आक्रमणात १४ पाकिस्तानी सैनिक ठार

पेशावर (पाकिस्तान) – बलुच लिबरेशन आर्मीने (‘बी.एल्.ए.’ने) २ वेगवेगळ्या आक्रमणांमध्ये १४ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे. पहिले आक्रमण बलुचिस्तानमधील बोलान जिल्ह्यातील माच भागात झाले. येथे बी.एल्.ए.ने रिमोट कंट्रोल्ड बाँबद्वारे पाकच्या सैन्याचे वाहन उडवून दिले. स्फोट इतका शक्तीशाली होता की, गाडीतील सर्व १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले.

दुसरे आक्रमण केच जिल्ह्यातील कुलाग तिग्रान भागात झाला जिथे पाकिस्तानी सैन्याच्या बाँब निकामी पथकावर स्फोट घडवण्यात आला. यात २ सैनिक ठार झाले.

बी.एल्.ए.चे प्रवक्ते जियांद बलोच यांनी या आक्रमणांचे दायित्व घेत म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्य हे व्यावसायिक सैनिकी दल नाही, तर परकीय हितसंबंधांसाठी काम करणारी भाडोत्री सेना आहे. बलुच स्वातंत्र्याची लढाई आणखी तीव्र केली जाईल आणि पाकिस्तानी सैन्याला प्रत्येक आघाडीवर योग्य उत्तर दिले जाईल.