कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० निवडक पाणथळ जागांवर ‘प्लास्टिकमुक्त स्वच्छता मोहीम’ हाती घेण्यात आली असून ४ मे या दिवशी संत राऊळ महाराज महाविद्यालयाने पाट तलावाची स्वच्छता केली. या वेळी पाट तलावातून जवळपास २०० किलो प्लास्टिक आणि अन्य कचरा बाहेर काढण्यात आला.
या मोहिमेमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे ४० विद्यार्थी, प्राध्यापक, वन विभाग, ‘देशपांडे फाऊंडेशन’, ‘वनशक्ती फाऊंडेशन’, पाट ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संकलित करण्यात आलेल्या या प्लास्टिक कचर्यावर परूळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यात येणार आहे. ११ मे या दिवशी दाबाचीवाडी येथील स्वच्छता मोहिमेचा पुढील टप्पा पार पडणार आहे.