बांदा – सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावात भारत संचार निगम लिमिटेड (बी.एस्.एन्.एल्.) या आस्थापनाचा नवीन ‘टॉवर’ गेल्या वर्षी उभारण्यात आला असूनही गेले अनेक महिने वारंवार ‘नेटवर्क’ सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे निगुडे गावासह पंचक्रोशीतील ग्राहकांना फटका बसत आहे. ८ दिवसांत बी.एस्.एन्.एल्.ची सेवा तात्काळ सुधारा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू, अशी चेतावणी निगुडेचे माजी सरपंच गुरुदास गवंडे यांनी उप महाप्रबंधक रविकुमार जिन्नू यांना दिली आहे.
गुरुदास गवंडे यांनी उपमहाप्रबंधक जिन्नू यांची भेट घेत निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, निगुडे टॉवरमधील नेटवर्कविषयी तांत्रिक विभागाचे प्रमुख श्री. माथुर, तसेच श्री. फुटाणे यांच्याकडे वारंवार तक्रार केली. तेव्हा थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. बी.एस्.एन्.एल्.च्या सेवेत सुधारणा न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल.
रविकुमार जन्नु यांनी ‘तातडीने या टॉवर संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल’, असे आश्वासन दिले.