
सिंधुदुर्ग – केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज ७ मे या दिवशी ‘मॉक ड्रिल’ करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मॉक ड्रिल’साठी दुपारी ३ ते ३.२० या वेळेत मालवण नगरपालिका क्षेत्र, वेंगुर्ला नगरपालिका क्षेत्र, सावंतवाडी नगरपालिका क्षेत्र, कणकवली नगरपालिका क्षेत्र, देवगड सागरी भाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण क्षेत्र निवडले आहे, तसेच रात्री ८ ते ८.१५ या वेळेत देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात वीज बंद म्हणजेच ‘ब्लॅकआऊट’ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून काही सूचना प्राप्त झाल्यास या वेळांमध्ये पालट होऊ शकतो, अशीही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
‘सायरन’ची व्यवस्था असलेल्या ठिकाणी दुपारी ४ वाजता २ मिनिटांसाठी सायरन चढ-उताराच्या स्वरूपात वाजेल. सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी स्वत: सुरक्षित स्थळी जावे. ४ वाजून १८ मिनिटांनी १ मिनिटासाठी शेवटचा सायरन वाजेल. त्यांनतर ‘मॉक ड्रिल’ संपेल. या वेळी आरोग्य विभाग, अग्नीशमन दल, पोलीस प्रशासन, तसेच अन्य संबंधित यंत्रणा साहाय्य करणार आहेत. ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतींनी आणि ज्या अधिकोषांमध्ये सायरनची सुविधा आहे, अशा ठिकाणी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सायरन संदर्भात कार्यवाही करण्याची सूचनाही जिल्हाधिकार्यांनी दिली.