सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव म्हणजे रामराज्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल ! – श्री. चैतन्य तागडे, सनातन संस्था

  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव यांनिमित्त ३ दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन !

  • देशविदेशांतून २५ सहस्र, तर पुणे जिल्ह्यातून २ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार !

पत्रकार परिषदेत डावीकडून डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, अधिवक्ता मंगेश जेजुरीकर, श्री. शेखर मुंदडा, बोलतांना श्री. चैतन्य तागडे, ह.भ.प. श्री दत्तात्रय चोरघे महाराज, सौ. उज्ज्वला गौड आणि कु. क्रांती पेटकर

पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या दोन्हींचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच २५ सहस्रांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. या महोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून २ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदू आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सनातनचे साधक श्री. चैतन्य तागडे यांनी श्रमिक पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ येथे ६ मे या दिवशी  झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, ‘श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान कडेपठार’चे विश्वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर, ‘श्री क्षेत्र रांजणगाव गणपति देवस्थान ट्रस्ट’चे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री सौ. उज्ज्वला गौड, ‘चिंतामणी प्रासादीक दिंडी तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’चे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

महोत्सवाला वंदनीय आणि महनीय व्यक्तींना निमंत्रण

या महोत्सवाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर, ‘पतंजलि योगपिठा’चे संस्थापक प.पू. योगऋषि स्वामी रामदेव, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूर महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे,  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे अधिवक्ता विष्णु जैन आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.

संतांच्या पादुकांचे दर्शन !

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (इंदूर), समर्थ रामदासस्वामी, श्रीधरस्वामी, श्री कानिफनाथ स्वामी, प.पू. टेंबेस्वामी, समर्थ शिष्य श्री कल्याणस्वामी, श्री साईबाबा, संत वेणाबाई, श्री सिद्धारूढस्वामी (हुबळी), प.पू. गगनगिरी महाराज, प.पू. गोंदवलेकर महाराज आदी १० हून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. १९ मे या दिवशी विश्वकल्याणार्थ त्याचप्रमाणे सनातन धर्मीयांच्या आरोग्यासाठी ‘महाधन्वंतरी यज्ञ’ होणार असल्याचेही तागडे यांनी सांगितले.

‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे १ कोटी श्रीरामनामाचा जप

‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे १ कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार असून १०० शंखांचा शंखनाद, संत सभा, पादुका दर्शन सोहळा, महाधन्वंन्तरी यज्ञ हे महोत्सवामध्ये होणार असल्याची माहिती श्री. चैतन्य तागडे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातून महोत्सवासाठी जाणारे संत-महंत, तसेच विशेष मान्यवर !

या भव्य-दिव्य महोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे, ‘जय शंकर प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य पप्पाजी पुराणिक, ‘श्री क्षेत्र रांजणगाव गणपति देवस्थान ट्रस्ट’चे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री सौ. उज्ज्वला गौड, विंग कमांडर शशिकांत ओक, प्रसिद्ध लेखक अभिजित जोग, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्‍ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल आदींसह ५० हून अधिक प्रतिष्ठित मान्यवर येणार आहेत.

भारतामध्ये गोवा राज्याचे गोसेवेसाठी सर्वांत मोठे योगदान ! – शेखर मुंदडा

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोग, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून सहभागी होणार आहे. भारतामध्ये गोवा राज्याचे गो-सेवेसाठी सर्वांत मोठे योगदान दिले आहे. गोमाता संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे सप्त परिक्रमा पूर्ण होईल अशा पद्धतीने भव्य गोमंडप उभारणार आहे.

‘अध्यात्मशास्त्र आणि साधना’ हा विषय अनिवार्य करावा ! – डॉ. तुषार पाचुंदकर पाटील

गोवा येथे होणार्‍या महोत्सवामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून सहभागी होणार असून ‘अध्यात्मशास्त्र आणि साधना’ हा विषय सरकारने शालेय शिक्षणामध्ये अनिवार्य करावा, अशी मागणी डॉ. तुषार पाचुंदकर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

हा महोत्सव म्हणजे राष्ट्राच्या उन्नतीसाठी चाललेला मोठा यज्ञ आहे ! – अधिवक्ता मंगेश जेजुरीकर

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सर्व कार्यकर्ते गोव्यातील महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. गोवा राज्याला धार्मिक परंपरा आणि इतिहास लाभला आहे. हा महोत्सव म्हणजे राष्ट्राच्या उन्नतीसाठी चाललेला मोठा यज्ञ आहे. सर्वांनी धार्मिक परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

सकारात्मक ऊर्जेने युवा पिढी सनातन धर्माकडे आकर्षित होईल ! – सौ. उज्ज्वला गौड

गोवा येथे होणार्‍या महोत्सवातून मोठी ऊर्जा प्राप्त होणार आहे. या सकारात्मक ऊर्जेमुळे युवा पिढी सनातन धर्माकडे आकर्षित होईल. सनातन धर्माचा पगडा वाढून पाश्चात्य संस्कृतीचा र्‍हास व्हावा, यासाठी हा महोत्सव आहे. हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी हा यज्ञ आहे. त्यामुळे हिंदुत्वाचे कार्य करण्याची ऊर्जा घेण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे.

जगाला सुख मिळावे यासाठी गोवा येथे यज्ञ ! – ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज  

वारी करतांना होणारा आनंद गोव्यातील महोत्सवात सहभागी होऊन घेणार आहे. जगाला सुख मिळावे, यासाठी होणारा यज्ञ हे विशेष आकर्षण आहे.

‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कारांचे वितरण होणार ! –  कु. क्रांती पेटकर

वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणार्‍या हिंदु वीरांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ हा जीवनगौरव पुरस्कार, तसेच धर्मासाठी लढणार्‍या धर्मरक्षकांना ‘सनातन धर्मश्री’ हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

या भव्य कार्यक्रमातून गोव्यामधील लोककलांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रे, सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण

१.  सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमात २ वेळा मी जाऊन आलो आहे. सनातन संस्थेचे कार्य नि:स्वार्थपणे चालते, हे मी स्वतः अनुभवले आहे. – श्री. शेखर मुंदडा

२. १७ मे या दिनांकाची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत. – सौ. उज्वला गौड, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज