जळगाव सेवाकेंद्राविषयी अधिक माहिती नसतांनाही शेजारच्या स्त्रीला ‘येथे आपल्या बाळासाठी योग्य उपाय मिळतील’, असे वाटून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटणे

सोनल विभांडिक

१. घराच्या गच्चीत बाळ खेळत असतांना ते साधारण २० फूट उंचीवरून खाली पडणे

‘जळगाव सेवाकेंद्राच्या समोर एक घर आहे. तेथे एक कुटुंब भाड्याने रहाते. त्यांना २ अपत्ये आहेत. त्यांपैकी १ दीड वर्षाचे बाळ आहे. एकदा त्या बाळाची आई त्यांच्या मोठ्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेली. त्या दिवशी त्यांचे यजमान घरीच होते आणि त्यांचे बाळ घराच्या गच्चीत खेळत होते. खेळता खेळता ते साधारण २० फुटांवरून खाली भूमीवर पडले. ‘ते नेमके कसे पडले ?’, हे कुणालाच कळले नाही. बाळाची आई घरी आली. तेव्हा तिला बाळ घराच्या फाटकाजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले.

२. तपासण्यानंतर बाळाचे सर्व अहवाल सर्वसामान्य येणे; परंतु बाळ झोपेतून घाबरून उठत असणे

बाळाचे आई-वडील लगेच त्याला रुग्णालयात घेऊन गेले. तेथे बाळाच्या सर्व तपासण्या केल्या. त्या तपासण्यांचे सर्व अहवाल सर्वसामान्य (‘नॉर्मल’) आले. असे असले, तरी ते बाळ झोपेतून मध्येच घाबरून उठायचे.

३. बाळाच्या आईला ‘सनातनच्या सेवाकेंद्रात जाऊन बाळासाठी उपाय विचारावेत’, असे वाटणे

नंतर त्या बाळाच्या आईला वाटले, ‘शेजारी सनातनचे सेवाकेंद्र आहे, तर तेथे जाऊन बाळासाठी काही उपाय मिळतात का ?’, ते विचारूया.’ त्यांनी त्याविषयी सेवाकेंद्रात विचारले.

४. साधकांनी बाळासाठी आध्यात्मिक उपाय करण्यास सांगणे 

साधकांनी त्यांना पुढील काही आध्यात्मिक उपाय करण्यास सुचवले.

अ. कुलदेवी आणि श्री दत्तगुरु यांचा नामजप करणे

आ. झोपतांना बाळाच्या भोवती देवतांच्या नामपट्ट्यांचे मंडल करणे

इ. सनातनची सात्त्विक उदबत्ती लावून ठेवणे, तसेच बाळाला उदबत्तीची विभूती लावणे

अशा प्रकारे बाळाच्या आईने ८ दिवस नियमितपणे नामजप, तसेच अन्य आध्यात्मिक उपाय केले.

५. आध्यात्मिक उपायांनी बाळाचा त्रास उणावणे आणि ‘गुरुदेवांनी बाळाला झेलल्यामुळे त्याला विशेष काही झाले नाही’, असे बाळाच्या आईने सांगणे

नंतर जेव्हा बाळाच्या त्रासाविषयी त्याच्या आईशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनी ‘बाळाचा त्रास आता उणावला आहे’, असे सांगितले. सनातनचा आश्रम आणि गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर) यांच्याविषयी त्यांना अधिक माहिती नव्हती; पण तरी त्यांना कृतज्ञता वाटत होती. बाळाच्या आईने सांगितले, ‘‘या आश्रमामुळे माझ्या बाळाला काही झाले नाही. तुमच्या गुरुदेवांमुळे आमचे बाळ सुरक्षित आहे. गुरुदेवांनीच बाळाला झेलले आणि त्यामुळे त्याला विशेष काही झाले नाही.’’ त्यांच्या घराच्या गच्चीतून सेवाकेंद्रातील ध्यानमंदिर दिसते. ‘ते बाळ ध्यानमंदिराच्या दिशेने पाहून नेहमी ‘जय बाप्पा’ असे करायचे’, असेही बाळाच्या आईने सांगितले.

त्यानंतर त्यांनी साधना आणि सनातनचे कार्य समजून घेतले. आता त्या सनातनच्या हितचिंतक झाल्या आहेत.’

– सोनल विभांडिक, जळगाव सेवाकेंद्र, महाराष्ट्र. (२३.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक