Illegal Madrassas Indo-Nepal Border : उत्तरप्रदेशाच्या नेपाळ सीमेवरील अवैध मदरसे आणि मशिदी यांच्यावर कारवाई

८० मदरशांना ठोकले टाळे

पिलीभीत (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने नेपाळ सीमेवर पुन्हा कारवाई करत अनेक मदरशांना टाळे ठोकले, तर अनेकांवर बुलडोझर कारवाई करत ते पाडले. तसेच काही मशिदींवरही कारवाई करण्यात आली आहे.

१. योगी आदित्यनाथ सरकारने नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये एक विशेष मोहीम चालू केली आहे. याअंतर्गत नेपाळ सीमेच्या १५ कि.मी. त्रिज्येतील अतिक्रमणांना टाळे ठोकले जात आहे. सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्यास बुलडोझरचा वापर केला जात आहे.

२. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या श्रावस्ती जिल्ह्यातील ६८ मदरसे बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने १६४ मदरसे रिकामे केले आहे. अनेक मदरशांना सतत नोटिसा पाठवल्या जात आहेत. बलरामपूर जिल्ह्यात १६ अवैध मदरसे बंद करण्यात आले आहेत. आणखी १८ धार्मिक स्थळे अवैध असल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर कारवाई चालू आहे. एका ईदगाहवरही कारवाई चालू आहे.

३. सिद्धार्थनगर जिल्ह्यामध्ये १७ अवैध मदरसे आणि ४ अवैध धार्मिक स्थळे आढळून आली आहेत. त्यांच्यावर कारवाई चालू आहे. बहराइचमध्ये ६ मदरशांना टाळे ठोकण्यात आले आहे.

४. महाराजगंजमधील अवैध आढळलेल्या ३४ मदरशांना नोटिसा बजावल्या असून त्यांपैकी २ बुलडोझरने पाडले आहेत. पिलीभीतमधील ७ मदरशांनाही नोटीस पाठवल्या आहेत. येथे ७७ अवैध धार्मिक स्थळेदेखील आढळून आली आहेत.

५. उत्तरप्रदेशाची नेपाळशी लांब सीमा आहे. गेल्या काही वर्षांत येथील सीमावर्ती भागांत मशिदी आणि मदरसे वेगाने वाढले आहेत. यांपैकी अनेक मशिदी आणि मदरसे अतिक्रमण करून बांधले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी गावांची लोकसंख्याही पालटली आहे.

संपादकीय भूमिका

इतके अवैध मदरसे आणि मशिदी बांधले जाईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? संबंधितांवरही कारवाई झाली पाहिजे !