लोकप्रतिनिधीचा निकटवर्तीय असलेल्या गावगुंडाकडून रिंग रोडच्या कामगारांना धमकी

उरुळी कांचन (जिल्हा पुणे) – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एम्.एस्.आर्.डी.सी.) तालुक्यातील १५ गावांत ‘रिंग रोड’चे (रिंग रोड म्हणजे बाह्य वळण रस्ता) काम सध्या चालू आहे. हा रिंग रोड हवेली तालुक्यातून जातो. बिवरी (ता. हवेली) येथील गोते मळा परिसराअंतर्गत चालू असलेल्या रिंग रोडच्या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना एका गावगुंडाकडून काम चालू केल्यास हात-पाय तोडण्याची धमकी देण्यात येत आहे. या विषयीचा एक ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. गावगुंडाच्या धमकीनंतर कामगारांनी काम थांबवले आहे. हा गावगुंड लोकप्रतिनिधीचा निकटवर्तीय असल्याची माहिती एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

यापूर्वीही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत; परंतु केवळ लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्यामुळे गावगुंडाचे धाडस वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. पोलिसांनी अशा गावगुंडांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा या गुंडगिरीचा फटका हा रिंग रोडच्या कामाला बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (पोलिसांनी राजकीय दबावापुढे न झुकता दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा अशा घटना विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करून नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करू शकतात ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

लोकप्रतिनिधींच्या आश्रयामुळे जर गुन्हेगारी प्रवृत्तींना अभय मिळत असेल, तर ती घटना लोकशाहीच्या मूल्यांनाच आव्हान देणारी आहे !