जगभरात लोकप्रियता मिळणार्‍या भारतीय संस्कृतीवर आधारित कथानकावर भर द्यावा !

‘नेटफ्लिक्स’च्या अधिकार्‍यांचा भारतीय चित्रपटकर्मींना मोलाचा सल्ला !

मुंबई – कुठल्याही माध्यमांसाठी निर्मिती करतांना भारतीय चित्रपटकर्मींनी भारतीय संस्कृतीवर आधारित कथानकाची निर्मिती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ‘नेटफ्लिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी मुंबईत ‘वेव्हज’ परिषदेत केले. ३ मे या दिवशी परिषदेत अभिनेते सैफ अली खान यांनी टेड सारंडोस यांची मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी भारतात केलेल्या गुंतवणुकीतून ‘नेटफ्लिक्स’ला झालेल्या आर्थिक लाभाविषयी माहिती देतांना वरील आवाहन केले. भारतीय संस्कृतीवर आधारित आशय जगभरात अधिक लोकप्रिय होत आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

टेड सारंडोस पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०२३-२४ मध्ये जगात ‘नेटफ्लिक्स’वर ३ अब्ज घंटे भारतीय कार्यक्रम पाहिले गेले. प्रतिआठवड्याला प्रदर्शित होणार्‍या पहिल्या १० सर्वाेत्तम वेबमालिका किंवा वेबपट यांच्या सूचीत एक भारतीय मालिका निश्चितपणे असायचीच. वर्ष २०२१ ते २०२४ या कालावधीत ‘नेटफ्लिक्स’ने भारतात १६ सहस्र कोटी रुपये, म्हणजे २०० कोटी डॉलर इतका नफा कमावला. ‘नेटफ्लिक्स’ला झालेल्या आर्थिक लाभातून भारतीय निर्मिती संस्थांमधील २० सहस्र जणांना रोजगार उपलब्ध झाला. आतापर्यंत भारतातील ९० शहरांमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. यामध्ये १५० भारतीय वेबमालिका आणि वेब चित्रपट यांचा समावेश आहे.’’