वडिलांचे निधन झाल्यावरही स्थिर आणि शांत असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) हर्षदा दातेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे) !

‘एकदा मी सुश्री (कु.) हर्षदा दातेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे) यांची आई श्रीमती नीलम दातेकर यांच्या समवेत रुग्णालयात थांबले होते. तेव्हा हर्षदाताईची माझ्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सुश्री (कु.) हर्षदा दातेकर

१. स्थिर आणि शांत राहून कृती करणे

हर्षदाताईचे आई-वडील दोघेही रुग्णालयात भरती होते. तिच्या वडिलांचे (नितीन दातेकर यांचे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) निधन झाले. मी तिला भेटल्यावर ‘ती स्थिर आहे’, असे मला जाणवले. ती ‘वर्तमान स्थितीत काय करता येईल ?’, असा विचार करत होती. ती अनेक गोष्टी ताण न घेता शांतपणे हाताळत होती.

सुश्री (कु.) प्रणिता सुखठणकर

२. विचारून घेण्याची वृत्ती आणि निर्णयक्षमता

ती प्रत्येक प्रसंगात वस्तूस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घेत होती. ती स्वतःच्या विचारांवर ठाम न रहाता इतरांना विचारून घेत होती.

३. प्रेमभाव

ताई तिच्या समवेत असलेले कुटुंबीय आणि साधक यांची विचारपूस करत होती. ती त्यांच्या खाण्या-पिण्याची काळजी घेत होती. तिची झोप पूर्ण झाली नव्हती, तरीही त्याविषयी तिने कोणाकडेही गार्‍हाणे केले नाही.

४. कृतज्ञताभाव

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, आई-वडील आणि अन्य साधक यांनी स्वतःवर (ताईवर) चांगले संस्कार केले आहेत’, असे वाटून हर्षदाताई नेहमी कृतज्ञताभावात असते’, असे मला जाणवले.

रुग्णालयात सेवेला जाण्यापूर्वी माझ्या मनात थोडी भीती होती; पण हर्षदाताईशी बोलल्यावर मला स्थिर रहाता आले. या प्रसंगात हर्षदाताईकडून मला शिकायला मिळाले. त्यासाठी मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) प्रणिता सुखठणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२५)