१४.४.२०२४ या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे सेवा करणार्या सौ. रंजना गौतम गडेकर यांना नागोठणे (जिल्हा रायगड) येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मस्थानी जाण्याचा योग आला. नागोठण्याला जाण्याच्या आदल्या दिवशी आलेल्या अनुभूती ५ मे या दिवशी पाहिल्या. आज पुढील भाग पाहूया.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/910246.html

३. नागोठण्याला गेल्यानंतर
३ अ. अंगणातील भूमीवर पाय ठेवल्यावर दैवी ऊर्जा जाणवणे : नागोठण्याला गेल्यानंतर घराचे फाटक उघडून मी अंगणातील भूमीवर पाय ठेवताच मला ‘भूमीतील सकारात्मक स्पंदने पायातून माझ्या शरिरात प्रवेश करत आहेत’, असे जाणवले. त्या वेळी ‘ती दैवी ऊर्जा आहे’, असे मला जाणवत होते.

३ आ. वास्तूत प्रवेश केल्यानंतर ‘दैवी शक्ती देहात संक्रमित होत आहे’, असे जाणवणे : वास्तूत प्रवेश केल्यावर ‘तेथे दैवी शक्ती आहे आणि ती माझ्या देहात संक्रमित होत आहे’, असे मला जाणवत होते. तेथे बैठक खोली आणि त्याला लागूनच प.पू. डॉक्टरांचा जन्म झालेली खोली आहे. तेथे मला अधिक प्रमाणात दैवी शक्ती आणि ऊर्जा जाणवत होती. त्यांचा स्पर्श माझ्या पायांच्या तळव्यांना जाणवत होता.
३ इ. प.पू. डॉक्टरांचा जन्म झालेल्या खोलीत प्रवेश करणे
३ इ १. खोलीच्या लाद्यांतून दैवी ऊर्जा धुरकट रंगात ऊर्ध्व दिशेने जातांना दिसत होती.
३ इ २. खोलीत देवतांच्या पाषाणमूर्ती दिसणे : त्या खोलीत मी नामजपाला बसल्यावर ‘खोलीच्या चारही बाजूंना एका रांगेत देवतांच्या पाषाणमूर्ती आहेत. ‘प.पू. डॉक्टरांच्या जन्माच्या वेळी ज्या देवता तेथे प्रकट झाल्या होत्या, त्यांनी सूक्ष्मातून पाषाणरूप धारण केले आहे आणि पाषाणरूपात तेथे त्यांचे अस्तित्व आहे’, असे मला दिसले.
३ इ ३. खोलीतील सूक्ष्म युद्धाचे पडसाद प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात दिसणे : खोलीत असलेल्या प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात त्यांच्या डोळ्यांखाली काळे झाल्याचे मला दिसले. तेथील सूक्ष्म युद्धाचे पडसाद प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात दिसत होते.
३ ई. जन्मस्थानी प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व वेगवेगळ्या अवस्थांत अनुभवणे : मला त्या वास्तूत प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व वेगवेगळ्या अवस्थांत दिसले. कधी ते बालरूपात इकडेतिकडे पळतांना दिसत होते. कधी प्रौढावस्थेत तेथे वावरतांना, तर कधी आताच्या त्यांच्या वृद्धावस्थेत ते आसंदीवर बसलेले दिसले. ‘ते त्या वास्तूत वेगवेगळ्या रूपांत वावरत आहेत’, असे मला दिसत होते आणि त्यांचे अस्तित्व जाणवत होते. ‘तेथे एखाद्या मंदिरापेक्षाही अधिक चैतन्य आहे’, असे मला जाणवले.
३ उ. बैठक खोलीमध्ये अदृश्य शक्तीचा दैवी स्पर्श स्थुलातून जाणवणे : मी घराच्या बैठक खोलीमध्ये उभी असतांना मला माझ्या डाव्या हाताला एका अदृश्य शक्तीचा स्पर्श स्थुलातून जाणवला. त्या वेळी मला ‘तो चांगल्या शक्तीचा स्पर्श आहे’, असे जाणवले.’ त्या वेळी तेथे दैवी आणि चांगल्या शक्तींचा वास आहे’, याविषयी माझी निश्चिती झाली.
३ ऊ. ‘घराची मागील बाजूही सात्त्विक आणि दैवी ऊर्जेने भारित आहे’, असे लक्षात येणे : मी घराच्या मागील बाजूला अनवाणी फिरत होते. तेथेही दैवी ऊर्जेचा स्पर्श मला माझ्या तळपायांना जाणवला. तेथे दैवी ऊर्जा असल्यामुळे तेथील ‘दगड आणि मातीही सात्त्विक झाली असून ती दैवी ऊर्जेने भारित झाली आहे’, हे माझ्या लक्षात आले.
३ ए. वास्तूतील पंचतत्त्वांची शुद्धी होऊन ती दैवी ऊर्जेने भारित झालेली असणे : तेथील पाण्याने मी हात-पाय धुतले. तेव्हा माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण क्षणांत निघून गेले. तेथील ‘पंचतत्त्वांची (भूमी, पाणी, प्रकाश, हवा आणि आकाश यांची) शुद्धी होऊन ती दैवी ऊर्जेने भारित झाली आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे पंचतत्त्वांचा स्पर्श झाल्याने मला आवरण निघून गेल्याची अनुभूती आली.
४. साधना न करणार्या व्यक्तीची त्रासदायक स्पंदने आणि त्याची शक्ती वास्तूत कार्यरत असल्याने ती वास्तू दूषित होऊन तिचा अन्य व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होणे
जेव्हा एखादी सर्वसामान्य व्यक्ती तिचे वास्तव्याचे ठिकाण सोडून जाते, तेव्हा तेथे तिचे स्थुलातून काही अस्तित्व रहात नसले, तरी त्या व्यक्तीने साधना न केल्यामुळे तिची नकारात्मक आणि त्रासदायक स्पंदने अन् शक्ती त्या वास्तूत कार्यरत रहाते. तिच्या नकारात्मकतेचा परिणाम त्या वास्तूवर होऊन ती वास्तू दूषित होते. त्यामुळे अशा वास्तूंत आपले शरीर, मन, बुद्धी इत्यादींवर नकारात्मक परिणाम होतो.
५. प.पू. डॉक्टरांच्या जन्मस्थानी दैवी ऊर्जेची अनुभूती येऊन तेथे प.पू. डॉक्टरांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवणे
‘प.पू. डॉक्टरांच्या जन्मस्थानी अजूनही (८२ – ८३ वर्षांनंतरही) सकारात्मक आणि दैवी ऊर्जा आहे’, अशी अनुभूती येते अन् तेथे त्यांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवते. ज्या स्थानी अवतारांचा जन्म होतो आणि ज्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते, तेथे कार्य संपल्यावरही त्यांचे अस्तित्व अन् शक्ती कार्यरत असते. याची अनुभूती मला नागोठणे येथे गेल्यावर आली. ‘अवतारांनी त्यांचे जन्मस्थान किंवा त्यांचे वास्तव्यस्थान सोडले, तरी सहस्रो आणि लाखो वर्षे त्यांची शक्ती तेथे कार्यरत असल्याची अनुभूती भक्तजनांना का येते ?’, याची प्रचीती मला प.पू. डॉक्टरांच्या जन्मस्थानी गेल्यावर आली.
प.पू. डॉक्टरांचे जन्मस्थान पहाण्याची माझी तीव्र इच्छा होती. देवानेच ती इच्छा पूर्ण केली. गुरुदेवांच्या कृपेनेच मला तेथे जाण्याची संधी मिळाली आणि विविध अनुभूतीही आल्या. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
(समाप्त)
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२९.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |