Terrorists Helper’s Death : आतंकवाद्यांना साहाय्य करण्याच्या आरोपातून पोलिसांनी पकडलेल्या तरुणाचा नदीमध्ये उडी मारल्याने मृत्यू

तरुणाच्या कुटुंबियांचा पोलिसांवर हत्या केल्याचा आरोप

नदीत उडी मारताना आरोपी इम्तियाज अहमद मगरे (वर्तुळात)

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पहलगाम येथील आक्रमणाच्या प्रकरणी एका काश्मिरी मुसलमानाला पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतल्यावर त्याने त्यांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी तेथील नदीमध्ये उडी मारली. त्यानंतर तो बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. इम्तियाज अहमद मगरे (वय २२ वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. इम्तियाजच्या कुटुंबियांनी सुरक्षादलांवर त्याचा कोठडीत मृत्यू झाल्यानंतर नदीत फेकून दिल्याचा आरोप केला आहे.

काश्मीर पोलिसांनी सांगितले की, इम्तियाजने तो आतंकवाद्यांचा ‘ओव्हरग्राउंड वर्कर’ (गोपनीय पद्धतीने साहाय्य करणारा) असल्याचे मान्य केले होते. २३ एप्रिल या दिवशी आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीशीही त्याचा संबंध होता. त्या दिवशी २ आतंकवादी पळून गेले होते. त्याने आतंकवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाविषयी माहिती असल्याचेही मान्य केले होते. यानंतर त्याच्या सूचनेनुसार त्याला जंगलातील ठिकाणी नेले जात होते. या वेळी त्याने बचावासाठी नदीत उडी मारली.

पोलिसांनी संपूर्ण घटनेचे ड्रोनद्वारे करण्यात आलेले चित्रीकरण प्रसारित केले आहे, ज्यामध्ये इम्तियाज नदीत उडी मारतांना आणि वाहून जातांना दिसत आहे. या प्रकरणात, केंद्रशासित प्रदेशाच्या कॅबिनेट मंत्री सकिना इटू यांनी घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

काश्मीरमधील आतंकवाद नष्ट न होण्यामागचे कारण म्हणजे तेथील जिहादी मानसिकतेच्या धर्मांध मुसलमानांचे आतंकवाद्यांना साहाय्य मिळत आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आतंकवाद चालूच रहाणार आहे !