‘बिट्स पिलानी’च्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचे आत्महत्यांचे वाढते प्रमाण असल्याचे प्रकरण
पणजी, ४ मे (वार्ता.) – ‘बिट्स पिलानी’च्या गोवा येथील संकुलातील वसतीगृहात विद्यार्थ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ‘बिट्स पिलानी’ व्यवस्थापनाने अभ्यासक्रमात पूर्णपणे पालट करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यानुसार अभ्यासक्रमामुळे तणावात असलेले विद्यार्थी आता परीक्षा नंतर देऊ शकणार आहेत.
‘बिट्स पिलानी’च्या गोवा संकुलातील वसतीगृहात विद्यार्थी कृष्णा कासेरा (मूळ लक्ष्मणपुरी, उत्तरप्रदेश) या २० वर्षीय विद्यार्थ्याने नुकतीच आत्महत्या केली. ‘बिट्स पिलानी’च्या गोवा संकुलात मागील ५ मासांतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. कृष्णा कासेरा याच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देतांना ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने कोणती पावले उचलली आहेत ?’ याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. या पार्श्वभूमीवर ‘बिट्स पिलानी’च्या व्यवस्थापनाने अंतर्गत अभ्यासक्रमात आवश्यक पालट करण्यासाठी एक समितीची स्थापना केली आहे.