बनावट कागदपत्रे सिद्ध करून १०० गुंठे भूमी लाटली

पुणे – ग्रामपंचायत मांजरी खुर्द (ता. हवेली) येथे २८ फेब्रुवारी २०२० या दिवशी ‘खोटी, बनावट आणि बोगस ग्रामसभा’ दाखवली. त्यातून स्वत:च्या लाभासाठीचे विषय संमत करून घेतले. त्या विरोधात संदीप उंद्रे यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. सदर प्रकरणी हवेली पंचायत समितीचे चौकशी अधिकारी एन्.डी. कारंडे यांनी सखोल चौकशी करून त्याचा ७९ पानी अहवाल २० नोव्हेंबर २०२० या दिवशी पंचायत समिती हवेली कार्यालयाकडे सादर केला होता. चौकशी अहवालात ‘दोषींच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंद करण्याचा स्पष्ट अभिप्राय’ नोंदवला होता. त्यानुसार वाघोली पोलीस ठाण्यात ३ मे या दिवशी तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि लिपिकांसह ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रत्यक्षात २८ फेब्रुवारी या दिवशी ग्रामसभा झाली नाही. तरीही ग्रामसभा इतिवृत्तांमध्ये एकूण ३ विषय नोंदवण्यात आले.
विषय क्र. १, ठराव नं. ६३ यात ‘जलजीवन मिशन अंतर्गत कृती आराखडा’ सादर करण्याबाबत, विषय क्र. २, ठराव नं. ६४, ‘गावठाणातील मोकळी जागा आणि शाळेची इमारत ‘गुरुकुल एज्युकेशन अँड सोशल फाऊंडेशन’ यांचे नावे नोंद घेण्याबाबत, विषय क्र. ३, ठराव नं. ६५, आलेल्या अर्जांचा विचार करणे. विषय क्र. २, ठराव नं. ६४ नुसार गावातील १०० गुंठे सरकारी गावठाण भूमी आणि एका शैक्षणिक संस्थेची इमारत (सिमेंट काँक्रीटचे ८ सहस्र ५११.४८ चौ. फूट) या दोन्ही मिळकती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे यांनी स्वत:च्या संस्थेच्या नावावर केल्या आहेत, असा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराला चाप बसवण्यासाठी आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, असेच सामान्य जनतेला वाटते ! |