हिंदु धर्मात गाय आणि तुळशी वृंदावन यांचे महत्त्व लाखमोलाचे ! – विद्यावाचस्पती डॉ. संजय कोटणीस महाराज

खरशिंग (सांगली) येथे गोशाळा प्रकल्पाचा पायाभरणी आणि भूमीपूजन समारंभ उत्साहात पार पडला !

कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली), ४ मे (वार्ता.) – हिंदु धर्मात गाय आणि तुळशी वृंदावन यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायीला वंदन करून ५ प्रदक्षिणा घातल्यावर त्रास अल्प होतो, असे वेदांमध्ये सांगितले आहे. आम्ही केवळ ‘पोस्टमन’चे काम करतो. महाराज सर्व करवून घेत असतात. भगवंताची सेवा निष्काम भावनेने केली, तर पुण्य मिळते. खरशिंग येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्यावरील अपार श्रद्धेमुळेच भव्य गोशाळा होत आहे, असे मत विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. संजय कोटणीस महाराज यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील कवठेमंहाकाळ तालुक्यातील खरशिंग येथे श्री राममंदिर आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पादुका मंदिराच्या प्रांगणात प्रशस्त ५१ गायींच्या ‘श्री महाराजांची गोशाळा’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पायाभरणी आणि भूमीपूजन समारंभ विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. संजय कोटणीस महाराज, श्री दीपक नाना केळकर महाराज, देशिंगचे प.पू. आनंद गिरी महाराज, गोव्याचे अवधूत रायकर, मंदिराचे विश्वस्त श्री. प्रदीप सव्वाशे यांच्या हस्ते नुकताच झाला. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.