पुणे – पुणे महापालिका, तसेच वाहतूक पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता सिंहगड रस्त्यावरून राजाराम पुलाकडे जाणारा रस्ता ३ दिवसांपूर्वी बंद करणार्या संबंधित ठेकेदाराला महापालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून ३ दिवसांत तो खुलासा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
पुणे शहरातून वहाणार्या मुळा-मुठा नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून हे पूल वापरासाठी सुस्थितीत आहेत का ? याची पडताळणी करण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. राजाराम पुलावरील ‘एक्स्टेंशन जॉइंट’चे काम करण्यासाठी प्रशासनाने ठेकेदाराला अनुमती दिली आहे. त्यानुसार या ठेकेदाराने वाहतूक पोलिसांना अर्ज केला. पोलिसांनी त्याला अनुमती दिल्यानंतर महापालिकेच्या प्रकल्प विभागाला आणि पोलिसांना पूर्वसूचना न देता ठेकेदाराने २८ एप्रिलला सकाळी सिंहगड रस्त्यावरून कर्वे रस्त्याकडे राजाराम पुलावरून जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली होती.