सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मस्थानी नागोठणे (जिल्हा रायगड)  येथे जाण्यापूर्वी आणि गेल्यावर साधिकेला दैवी शक्तींच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१४.४.२०२४ या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे सेवा करणार्‍या सौ. रंजना गौतम गडेकर यांना नागोठणे (जिल्हा रायगड) येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मस्थानी जाण्याचा योग आला. नागोठण्याला जाण्याच्या आदल्या दिवशी आणि तेथे गेल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. नागोठण्याला जाण्याच्या आदल्या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती 

१ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचे विष्णुरूपात दर्शन होणे : १३.४.२०२४ या दिवशी मी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपासाठी बसले होते. त्या वेळी मला ‘परात्पर गुरु डॉक्टर विष्णुरूपात प्रगटले आहेत’, असे दृश्य दिसले.

सौ. रंजना गडेकर

१ आ. नागोठणे येथील घरी मोठा प्रकाशझोत दिसून तेथील भूमीवर नवजात बाळ दिसणे : नागोठणे येथील घरातील एका खोलीच्या मध्यभागी मला मोठ्या प्रकाशाचा झोत आकाशातून खाली येतांना दिसला. तो प्रकाशझोत भूमीला टेकला आणि त्या गोल प्रकाशाच्या खाली भूमीवर मला नुकतेच जन्मलेले बाळ दिसले.

१ इ. श्रीविष्णूचा बाळाच्या रूपात जन्म झालेला असणे : बाळ दिसल्यावर मला तेथे भगवान श्रीविष्णु गरुडावर बसून अवतरित झाल्याचे दिसले. नंतर ते गरुडावरून खाली उतरले. प्रत्यक्ष श्रीविष्णूचाच बाळाच्या रूपात जन्म झाल्यावर देवता आणि ऋषिमुनी आकाशातून त्या बालरूपावर पुष्पवृष्टी करतांना दिसले.

१ ई. प.पू. डॉक्टरांचा जन्म झाल्यावर वस्त्रालंकारांनी सुशोभित देवता त्यांच्या सभोवती दिसणे : बाळाच्या जन्माच्या वेळी मला मध्यभागी वरून खाली येणार्‍या प्रकाशझोताच्या सभोवती प्रकाशरूपी दैवी गोळे दिसले. नंतर त्यांचे रूपांतर देवतांच्या रूपात झाले. अवताररूपी प.पू. डॉक्टरांचा जन्म झाला. त्या वेळी वस्त्र आणि मुकुटादी अलंकारांनी सुशोभित अशा देवता त्या खोलीत त्यांच्याभोवती गोलाकार बसलेल्या दिसल्या. (त्या वेळी आश्रमातील ध्यानमंदिरात मला माझ्यासमोर उघड्या डोळ्यांनी देवतांच्या रूपात असलेला प्रकाशाचा एक गोळा दिसला. जे दृश्य मला सूक्ष्मातून दिसत होते, तेच दृश्य मी ध्यानमंदिरात स्थुलातूनही पहात होते.)

१ उ. बालरूपातील प.पू. डॉक्टरांचे झालेले मनोहारी दर्शन ! : नंतर ‘१ वर्षाचे बालरूपातील प.पू. डॉक्टर त्या वास्तूत इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांच्या इवल्याशा चरणांतून प्रकाशरूपी शक्ती भूमीत संक्रमित होत आहे आणि ती पाताळाच्या दिशेने खाली जात आहे’, असे मला दिसले.

वरील लिखाण करतांना ‘मी प.पू. डॉक्टरांच्या जन्मस्थानी जाणार आहे’, या विचाराने माझी भावजागृती होत होती.

२. नागोठण्याला जातांना 

१४.४.२०२४ या दिवशी नागोठण्याला जातांना माझा श्रीरामाचा नामजप होत होता. नागोठण्यातून जात असतांना मला वातावरणात सात्त्विकता जाणवत होती.

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२९.१.२०२५)         (क्रमश:)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक