९ मे या दिवशी संतांच्या वंदनीय उपस्थितीत कलशारोहण !

कोतवडे (रत्नागिरी), ४ मे (वार्ता.) – रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावची स्वयंभू आणि जागृत ग्रामदेवी श्री महालक्ष्मीमातेच्या मंदिराचा जीर्णाेद्धार सोहळा ८ ते १० मे या कालावधीत साजरा होणार आहे. विश्वस्त आणि समस्त ग्रामस्थ यांच्या समन्वयाने या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या कलशारोहणाचा मुख्य सोहळा परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री नृसिंह आश्रमाचे पू. स्वामी श्री दंडी महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत ९ मे या दिवशी होणार आहे. या आनंदसोहळ्यात समस्त कोतवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
८ मे या दिवशी या जीर्णाेद्धार सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत संप्रोक्षणविधी, दुपारी ४ ते सायंकाळी ७ कळशाची मिरवणूक, सायंकाळी ६ ते रात्री १० राक्षोघ्नयाग, रात्री १० नंतर भजन असे कार्यक्रम होणार आहेत.
९ मे या दिवशी सकाळी ७ ते ११ वास्तूशांती, सकाळी ११ ते दुपारी १२ कलशारोहण, दुपारी १२ ते १ पू. स्वामी श्री दंडी महाराज यांचे प्रवचन आणि देणगीदारांचे सत्कार, दुपारी १.३० ते ३.३० महाप्रसाद, दुपारी ४ ते रात्री १०.१५ भजने, रात्री १०.३० वाजता कोंढे (चिपळूण) येथील श्री आई माऊली नाट्यनमन मंडळाचे ‘बहुरंगी नमन’ आहे.
१० मे या दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ नवचंडीयाग, गावातील देणगीदारांचा सत्कार, दुपारनंतर कीर्तन आणि त्यानंतर ग्रामस्थांची भजने होतील.
विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व कोतवडेवासीय, नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले ग्रामस्थ, माहेरवाशिणी, तसेच समस्त भाविक यांनी या सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ‘पब्लिक देवस्थान ट्रस्ट, कोतवडे’च्या वतीने करण्यात आले आहे.