मुंबईत हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांची पोलिसांकडून पाठराखण

मुंबई – शहरातील फोर्ट येथील कॅपिटल गल्लीमध्ये ‘न्यू एम्पिअर थिएटर’च्या पादचारी मार्गावर गरीब हिंदूंना खाद्यपदार्थ आणि भेटवस्तू देऊन त्यांना धर्मांतर करण्याचे आवाहन काही ख्रिस्ती प्रचारक करत होते. या विरोधात शिवसेनेच्या कुलाबा शाखाप्रमुख सौ. मिताली पटेल यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. या वेळी सौ. मिताली पटेल यांना तब्बल ५ घंटे पोलीस ठाण्यात बसवून ठेवले; मात्र हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई केली नाही. (हा हिंदूंवरील अन्याय नव्हे का ? – संपादक)

१. ३० एप्रिल या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हा प्रकार चालू होता. या वेळी तेथे ३५-४० गरीब हिंदू महिला आणि मुले उपस्थित होती. धर्मप्रचारक त्यांना बॅग वाटत होते. यामध्ये २ पुरुष आणि ३ महिला ख्रिस्ती धर्मप्रचारक होत्या.

२. या बॅगांमध्ये काही वह्या आणि ख्रिस्ती धर्माची पुस्तके होती. त्यांना काही खाद्यपदार्थही त्यांनी दिले. त्यांनी सर्वांकडून येशूची प्रार्थना म्हणून घेतली. या वेळी ‘तुम्हाला हिंदु धर्मात काय मिळते ? तुम्हाला आम्ही नोकरी मिळवून देऊ. मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवून शिक्षण देऊ. अन्न देऊ’, असे प्रचारक सांगत होते. (हिंदूंनी अशा आमिषांना भुलून जाऊ नये ! – संपादक)

पोलिसांनी धर्मप्रचार करणार्‍या ख्रिस्ती महिला आणि त्यांच्यासमवेत असलेल्या व्यक्तींना पोलीस ठाण्यात नेले. धर्मप्रचार करणार्‍या महिलेने स्वत:चे नाव ‘व्हिक्टोरिया’ सांगितले. ती तमिळनाडू येथील असून एका विवाह समारंभासाठी मुंबईत आल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. यु ट्यूबवर गरीब मुलांचे व्हिडिओ पाहून गरीब मुलांना बॅग आणि खाद्यपदार्थ देत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. यावर सौ. मिताली पटेल यांनी या महिला ख्रिस्ती धर्मात येण्याचे आवाहन करत असल्याचे पोलिसांना सांगितले; मात्र तेथे उपस्थित असलेल्या शिंदे नावाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी त्यांची तक्रार प्रविष्ट करून घेतली नाही. (असे कर्तव्यचुकार पोलीस काय कामाचे ? – संपादक) रात्री ११ वाजता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी दीपक दळवी तेथे आले. त्यांनाही श्री. आणि सौ. पटेल यांनी झालेला प्रकार सांगितला; मात्र माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. (तक्रार प्रविष्ट करण्याचे सौजन्यही न दाखवणार्‍या पोलिसांनी बडतर्फच करायला हवे ! – संपादक)

धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍यांना सौ. मिताली पटेल यांनी खडसावले !

काही हिंदुत्वनिष्ठांनी हा प्रकार सौ. मिताली पटेल यांना कळवला. सौ. मिताली पटेल त्वरित घटनास्थळी आल्या. त्यांनी ख्रिस्ती धर्मप्रचारकांना खडसावले. ‘गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांना धर्मांतर करण्याचे आवाहन का करता ?’ असे विचारल्यावर ते निघून जाऊ लागले. या वेळी सौ. मिताली पटेल यांनी पोलिसांना दूरभाष करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. काही पोलीस तेथे आले. त्यानंतर सौ. मिताली पटेल आणि त्यांचे यजमान श्री. भरत पटेल यांनी धर्मांतराच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारही केली; मात्र पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेतली नाही. (धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या सौ. मिताली पटेल आणि श्री. भरत पटेल यांचा धर्माभिमान सर्व हिंदूंसाठीच अनुकरणीय आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका

धर्मांतराची तक्रार प्रविष्ट करून न घेणार्‍या कर्तव्यच्युत पोलिसांवर काय कारवाई होणार ?, ते प्रशासनाने घोषित करायला हवे !