वैभववाडी – येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई अनिल गोविंद शेटे (वय ४० वर्षे, मूळ गाव कडोली, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर) यांनी वैभववाडी बाजारपेठेत ‘गुरव कॉम्प्लेक्स’मधील रहात्या घरी १ मे या दिवशी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. कुडाळ पोलीस ठाण्याच्या एका हवालदारानेही नुकतीच आत्महत्या केली होती.
शेटे यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार चालू होते. १ मेच्या रात्री त्यांची पत्नी स्वयंपाक करत होती आणि अनिल हे दुसर्या खोलीत होते. थोड्या वेळाने पत्नीने अनेक वेळा हाका मारूनही अनिल बाहेर आले नाहीत; म्हणून त्यांनी खोलीच्या खिडकीतून आत पाहिले असता ते पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसले. त्यामुळे पत्नीने आरडाओरड केल्याने शेजारी घटनास्थळी आले आणि परिस्थितीची माहिती पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी अनिल यांना खाली उतरवून रुग्णालयात भरती केले; मात्र डॉक्टरनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
अल्प कालावधीत २ पोलिसांनी आत्महत्या करणे हा चिंतेचा विषय असून पोलिसांनी आत्महत्या करण्यामागे कौटुंबिक अडचणी, कामाचा ताण, कुटुंबाला पुरेसा वेळ देता न येणे, वरिष्ठांचा दबाव किंवा अन्य कोणती कारणे आहेत, याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.