काणकोण येथे मुख्य रस्त्यावर रेखाटले पाकिस्तानचे ध्वज सभापती तवडकर यांच्याकडून पोलिसात तक्रार

काणकोण, २ मे (वार्ता.) – पहलगाम आतंकवादी आक्रमणामुळे देशात संतप्त वातावरण असतांना काणकोण पालिका क्षेत्रात काणकोण कदंब बसस्थानकाजवळ आणि चावडी-पणसुले जोडरस्ता अशा एकूण २ ठिकाणी ऑईल पेंटने पाकिस्तानचे ध्वज रंगवण्यात आले आहेत. २ मे या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर काणकोण बरोबरच राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक आमदार तथा गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी यासंबंधी अज्ञातांच्या विरोधात काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी दोषींना शोधून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काणकोण परिसरातून रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येते, तरीही पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर रंगवण्याचे धाडस करण्यात आल्याबद्दल स्थानिक नागरिक सिद्धार्थ देसाई यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत आहेत. मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.