पुणे – महापालिकेत कंत्राटी सुरक्षारक्षकांचा पुरवठा करण्यासाठी १३९ कोटी रुपयांची निविदा काढली आहे; मात्र जुन्या निविदेतील २२८ सुरक्षारक्षकांना मार्च महिन्यापासून वेतन मिळाले नाही. महापालिकेने ‘मे. ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस प्रा. लि.’ या ठेकेदाराला कामगारांचे वेतन न केल्यास काळ्या सूचीत टाकण्याची चेतावणी दिली आहे. पुणे महापालिकेमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र ५६५ सुरक्षारक्षकांसाठी निविदा काढली जाते. गेल्या वर्षी ही निविदा ३ ठेकेदारांमध्ये विभागून दिली होती. (उर्वरित २ एजन्सीजने कर्मचार्यांचे वेतन दिले आहे.)
या ठेकेदारांना प्रत्येक महिन्याच्या १० दिनांकापर्यंत मागील महिन्यातील वेतन देणे बंधनकारक आहे. यामध्ये ईगल या आस्थापनाकडून २२८ कंत्राटी कामगार घेतले आहेत; मात्र त्यांनी कर्मचार्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे वेतन दिले नाही. या सुरक्षारक्षकांमध्ये ५० टक्के महिला असून १५ तृतीयपंथी सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या ठेकेदारांची मुदत संपली आहे; मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशांना नुसते काळ्या सूचीत न टाकता त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |