संपादकीय : व्यभिचारासाठीही अभिव्यक्तीस्वातंत्र्य !

‘प्रौढांसाठी’ या सभ्य शब्दाच्या आडून सध्या अनेक वेब सिरीजवरून अश्लीलतेचा नंगानाच चालू आहे. केवळ अश्लीलताच नव्हे, यातून व्यभिचाराचा उच्चांक गाठला जातो. विवाहित महिलेचे अन्य पुरुषांशी संबंध, जावयाचे सासूशी, सासर्‍यांचे सुनेशी शारीरिक संबंध ‘केवळ प्रौढांसाठी’ या शब्दांच्या आडून कायद्याच्या चौकटीत बसवले जातात. या व्हिडिओंच्या क्लिप्स (छोट्या ध्वनीचित्रफिती) ‘यू ट्यूब’, ‘फेसबुक’, ‘एक्स’ आदी सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केल्या जातात. विद्यार्थी, युवक व्यभिचाराच्या या भडिमाराची शिकार होत आहेत. ‘केवळ प्रौढांसाठी’ हा शब्दप्रयोग केवळ अश्लीलता आणि व्यभिचार यांना कायद्याच्या चौकटीत बसवण्याचे माध्यम झाला आहे. असाच व्यभिचार आणि अश्लीलता प्रसारित करणारे ‘उल्लू ॲप’ सध्या चर्चेत आहे. आंबटशौकिन पैसे देऊन हे ‘ॲप’ विकत घेतात आणि कायद्याच्या चौकटीत राहून हा व्यभिचार पहातात. या ॲपवरील ‘हाऊस अरेस्ट’ या कार्यक्रमावरून सध्या वाद चालू आहे. या कार्यक्रमात एका बंद घरात काही युवक आणि युवती यांची निवेदक मुलाखत घेतो अन् त्यांना काही ‘टास्क’ (उद्दिष्ट) देतो’, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या कार्यक्रमामध्ये मुलाखत घेणारा निवेदक एजाज खान याने सहभागी युवतींना कपडे काढायला सांगितले. एवढ्यावर न थांबता संभोगाच्या मुद्रा दाखवायला सांगितल्या आणि गहना वशिष्टसह अन्य कलाकारांनी तसे कॅमेर्‍यापुढे ते करूनही दाखवले. या कार्यक्रमाच्या क्लिप्स जेव्हा सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्या, तेव्हा समाजातील विविध भागांतून याविषयी संताप व्यक्त करण्यात आला.

व्यभिचाराचे प्रमाणपत्र ?

केंद्रीय महिला आयोगाने या कार्यक्रमावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आणि ‘उल्लू ॲप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विभू अग्रवाल अन् ‘हाऊस अरेस्ट’चे निवेदक एजाज खान यांना ९ मे या दिवशी देहली येथील कार्यालयात उपस्थित रहाण्यासाठी नोटीस पाठवली. महिला आयोगाच्या निर्देशानंतर या कार्यक्रमाचे प्रसारण बंद करण्यात आले असून त्याचे सर्व भाग हटवण्यात आले आहेत. या ‘ॲप’चे निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार पांडे अन् एजाज खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतरही या कार्यक्रमाचे निर्माते, आयोजक आणि कलाकार यांना थोडीशीही लाज किंवा अपराधीपणाची भावना नाही. ‘एबीपी माझा’च्या एका पत्रकाराने गहना वशिष्ठ यांची मुलाखत घेतली. यामध्ये काम करणारे कलाकार पती-पत्नी होते आणि मीही माझ्या पूर्वीच्या प्रियकरासमवेत हे प्रकार केले. अशा प्रकारे गहना यांनी या अश्लीलतेचे समर्थन केले. ‘उल्लू ॲप’ हे ‘केवळ प्रौढांसाठी’ आहे आणि तो पैसे देऊन विकत घेता येतो. १८ वर्षांवरील व्यक्तीसाठी असलेल्या कार्यक्रमात अशी दृश्ये दाखवणे, हा काही गुन्हा नाही. ‘सामाजिक माध्यमांवरून जर या कार्यक्रमाच्या क्लिप्स प्रसारित होत असतील, तर त्या प्रसारित करणार्‍यांवर कारवाई करावी’, असे सांगायलाही गहना विसरल्या नाहीत. ‘अशा प्रकारचे व्हिडिओ केवळ या कार्यक्रमात तुम्ही पाहिले आहेत का ? हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री चित्रपट आणि वेब सिरीज यांमधून जेव्हा अशी अश्लीलता दाखवली जाते, ती तुम्हाला चालते का ? महिला आयोग आणि राजकीय क्षेत्रातील महिला नेत्यांनी प्रथम हा कार्यक्रम पूर्ण पहावा. या कार्यक्रमावर बंदीची मागणी करण्यापेक्षा त्यांनी गंभीर समस्यांकडे लक्ष द्यावे. आम्ही कामसूत्राचे शिक्षण यातून दिले आहे’, असे हे उद्दाम बोल गहना वशिष्ठ यांचे होते. कायदेशीरदृष्ट्या आणि प्रशासकीय कारवाईतील खुजेपणावर गहना वशिष्ठ यांनी अचूकपणे बोट ठेवले आहे. ‘उल्लू ॲप’चे निर्माते आणि कलाकार हे सर्व पैसा अन् प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत आहेत. त्यामुळे सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतरही त्यांना त्यांच्या नीच कृत्याचा मुळीच पश्चात्ताप झालेला दिसत नाही. त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखेही नाही; मात्र अश्लीलता दाखवूनही गहना वशिष्ठ यांनी जी शालजोडी मारली आहे, त्यातून चित्रपट परिनिरीक्षण मंडळ, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकारणी यांनी थोडा तरी बोध घ्यावा. ‘हाऊस अरेस्ट’सारख्या कार्यक्रमाच्या विरोधात सामाजिक उठाव झाल्यानंतर जागृत होणार्‍या या सर्व प्रशासकीय यंत्रणांनी असे प्रकार रोखण्यासाठी गांभीर्याने आणि विचारपूर्वक कार्यवाही करायला हवी.

ठोस कारवाई हवी !

समाजातील सर्व स्तरांवरून तीव्र विरोध होऊनही या कार्यक्रमाचे समर्थन करण्याचे धारिष्ट्य गहना वशिष्ठ यांच्यात आले कुठून ? याला सरकारी यंत्रणांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. ‘हिंदी चित्रपटसृष्टी आणि वेब सिरीज यांच्यातील अश्लीलतेविषयी तुम्ही कारवाई करत नाही, तर ‘ॲप’वरील ‘हाऊस अरेस्ट’ कार्यक्रमावर तुम्ही कोणत्या तोंडाने बोलता ?’, असाच प्रश्न गहना वशिष्ठ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वेळीच कारवाई झाली नाही, तर गहना वशिष्ठ यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, तेच भविष्यात आणखी कुणीतरी उपस्थित करील. यापूर्वी वेब सिरीजमधून दाखवण्यात आलेल्या व्यभिचारावर कारवाई का करण्यात आली नाही ? याचे सरकारी यंत्रणांकडे काय उत्तर आहे ? आतापर्यंत प्रशासनाने कारवाई न केल्याचा हा परिणाम आहे, हे सरकार आणि प्रशासन यांनी आतातरी लक्षात घ्यावे.

‘हाऊस अरेस्ट’ या कार्यक्रमाचे समर्थन करतांना गहना यांनी खजुराहो येथील कामसूत्रांचे शिक्षण देणारी लेणी, तसेच कायद्याने १८ वर्षांवरील व्यक्तीला कामविषयक कार्यक्रम पहाण्याला अनुमती दिली असल्याचे वक्तव्य केले आहे. हिंदु धर्मामध्ये चार पुरुषार्थांपैकी ‘काम’ हा एक पुरुषार्थ आहे आणि खजुराहो येथील लेणी किंवा भारतीय पुरातन ग्रंथ यांतून कामविषयक शिक्षण देतांना व्यभिचाराला कुठेही प्रोत्साहन दिलेले नाही. ‘हाऊस अरेस्ट’ किंवा अश्लील वेब सिरीज, चित्रपट यांमध्ये केवळ पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी दाखवता येईल तेवढा किळसवाणा व्यभिचार अन् अश्लीलता दाखवण्याची स्पर्धा चालते. त्यामुळे या मंडळींच्या तोंडी कामसूत्र, खजुराहो हे शब्दही शोभत नाहीत. व्यभिचाराचा नंगानाच करून वर कामसूत्राचे ज्ञान पाजळण्याचे धारिष्ट्य या कलाकारांमध्ये कायदा आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या कुचकामीपणामुळेच येत असते, हे लक्षात घेण्ो महत्त्वाचे आहे. ‘केवळ प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिले, म्हणजे व्यभिचाराचा नंगानाच करायला हे कलाकार मोकळे झाले का ? त्यांना त्याचा हक्क प्राप्त झाला आहे का ? जर असे नसेल, तर सरकारने याविषयी कडक कारवाई करावी. महिलेची मानहानी झाल्यानंतर कारवाई करणार्‍या आणि व्यभिचाराला प्रोत्साहन देणार्‍यांवर कारवाई न करणार्‍या यंत्रणांमुळेच अश्लीलता दाखवूनही गहनासारखी कलाकार निर्लज्जपणा दाखवत आहे. त्यामुळे व्यभिचार आणि अश्लीलता दाखवणार्‍या सर्वच कार्यक्रमांवर सरकारने निर्बंध घालायला हवेत अन् प्रशासकीय यंत्रणेत प्रभावी पालट करायला हवेत !

व्यभिचार दाखवण्याचा हक्क असल्याप्रमाणे अश्लीलता दाखवणार्‍यांवर सरकारने प्रभावी कायदा करून निर्बंध आणावा !