सिलिका वाळूच्या अवैध उत्खननामुळे कासार्डे भकास होणार !

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

प्रतिकात्मक चित्र

महसूल प्रशासनाला महिना कोट्यवधी रुपयांचा हप्ता

कणकवली – मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन करून तालुक्यातील कासार्डे गाव आणि परिसर भकास केला जात आहे. कासार्डेतील अवैधरित्या होणार्‍या सिलिका वाळू उत्खननासाठी महसूल प्रशासनालाच महिना २  ते अडीच कोटी रुपयांचा हप्ता दिला जातो. राजकीय वरदहस्त आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हे होत असून भविष्यात येथे हाणामार्‍या आणि हत्या आदी प्रकार होण्याची शक्यता आहे, असे गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

शहरातील विजय भवन मध्ये ही पत्रकार परिषद झाली. या वेळी कणकवली विधानसभा संघटक सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर आदी उपस्थित होते.

या वेळी करण्यात आलेले आरोप …

१. वर्ष २०२१ मध्ये एका उत्खनन करणार्‍या व्यावसायिकाला ३ कोटी रुपये दंड झाला होता; पण त्याची वसुली अद्यापही महसूल प्रशासन करू शकलेले नाही.

२. कासार्डेतील स्थानिकांना दमदाटी करून, आमिषे दाखवून त्यांच्या भूमीतून सिलिका वाळूचे उत्खनन केले जाते. एका महिलेच्या भूमीत अवैधपणे उत्खनन करण्यास प्रारंभ केल्यावर त्या महिलेने जेसीबीची चावी काढून घेतली.

३. सर्वसामान्यांनी थोडी माती काढली, तरी लगेच महसूल प्रशासन सक्रीय होऊन दंडात्मक कारवाई करते; मात्र कासार्डेत प्रतिदिन अवैधपणे सहस्रो टन सिलिका उत्खनन आणि त्याची वाहतूक होते; पण त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

४. त्यामुळे हे सर्व करण्यामागे कोण आहे ?, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी. येथील सिलिका वाळू उत्खननाच्या विरोधात आम्ही सर्व पातळीवर लढा देणार आहोत, तसेच उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहोत.