पीओपीवरील बंदीमुळे उंच, सुबक गणेशमूर्ती साकारणे अशक्य असल्याने तोडगा काढा

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तीवर बंदीचे आदेश दिले आहेत; पण ‘पीओपी बंदीमुळे उंच, सुबक गणेशमूर्ती साकारणे अशक्य आहे. त्याव्यतिरिक्त इतर पर्यायी घटक म्हणजेच शाडूमाती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे का ?, याचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘पीओपी बंदीवर तोडगा काढा’, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पत्राद्वारे सरकारकडे केली आहे.

समितीने म्हटले आहे की,…

१. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार पीओपी मूर्तींची निर्मिती करणे, त्यंची विक्री आणि विसर्जन यांवर न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिका प्रयत्नरत आहे; पण काही मूर्तीकार संघटनांनी त्याला विरोध केला आहे.

२. पीओपी मूर्तीवर सरसकट बंदी आणण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.  (या विरोधात न्यायालयात जाण्याचे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी मूर्तीकारांच्या बैठकीत केले होते !  – संपादक) ‘पर्यावरण संवर्धन ही काळाची आवश्यकता असून पर्यावरणपूरक उत्सव व्हावा’, असे समितीला वाटते; मात्र सरसकट पीओपी मूर्तीवर बंदी आणल्यास संस्कृती काळाच्या पडद्याआड जाण्यास वेळ लागणार नाही.

३. ‘पीओपी बंदी’ हा केवळ गणेशोत्सवपुरता मर्यादित विषय नाही. आश्विन महिन्यातील शारदोत्सव, माघ महिन्यातील गणेशोत्सव या उत्सवांवरही परिणाम करणारी आहे. पर्यावरण संवर्धनाच्या सामूहिक दायित्वाचे भान बाळगणे आवश्यक आहे; मात्र पीओपी मूर्ती बंदीविषयी उच्च न्यायालयाच्या आदेशावर मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मूर्तीकार संघटना आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी सर्व घटकांचा व्यापक विचार करून यातून मार्ग काढावा.