
वॉशिंग्टन – भारतातील पहलगाम येथे पाकपुरस्कृत इस्लामी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणासाठी पाकिस्तानला उत्तरदायी धरावे, अशी मागणी अमेरिकेतील १३ हिंदु संघटनांचा समावेश असलेल्या संयुक्त हिंदु गटांनी नुकतीच केली. पहलगाम आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदु संघटनांनी अमेरिकेतील विविध शहरांत शांततापूर्ण निदर्शने केली. पहलगाममधील हिंदूंचे हत्याकांड हे काश्मीरमधील हिंदूंवरील आक्रमणाच्या दीर्घ इतिहासातील लक्ष्यित धार्मिक हिंसाचाराचे अलीकडच्या काळातील घृणास्पद कृत्य आहे. यापूर्वी १९९० मध्ये अनुमाने ४ लाख काश्मिरी हिंदूंचा झालेला वंशविच्छेद, वर्ष २००० मध्ये झालेले अमरनाथ हत्याकांड (३२ ठार) आणि वर्ष २००२ मध्ये झालेले कासिमनगर हत्याकांड (२९ ठार) या लक्ष्यित धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.
हिंदूंनी हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन निदर्शने केली. आंदोलकांनी या वेळी ‘पहलगामसाठी न्याय’, पाकपुरस्कृत इस्लामी आतंकवाद थांबवा’ आणि ‘हिंदूंची हत्या थांबवा’ असे फलकही हातात धरले होते.