३० हून अधिक संस्था आणि संघटना यांचा सहभाग !

पुणे – ‘भगवान परशुराम की जय’, ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘जय श्रीराम’च्या जयघोषात आणि ढोल-ताशा, टाळ-मृदूंगाच्या गजरात हिंदूंचे आराध्य दैवत आणि भगवान विष्णूचे सहावे अवतार श्री भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त मध्य पुणे येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सर्व हिंदु समाजाला समवेत घेऊन केसरीवाडा ते शनिवारवाडा ही शोभायात्रा काढण्यात आली. या अंतर्गत महाराष्ट्र ब्राह्मण सभा, देवस्था ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, गौडा सारस्वत ब्राह्मण संघ, चित्पावन मित्र असोसिएशन आदी ३० हून अधिक संस्था आणि संघटना, तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या वेळी खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पांडे, रोहित टिळक आदी उपस्थित होते.

खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पहलगाम सारख्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सर्तक रहायला हवे. आपल्यातील जाती विसरून आपण हिंदु आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. देशासाठी आपण एकत्र येण्याची आवश्यकता आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, नुकत्याच झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे आपण एकत्र राहिलो, तर सुरक्षित राहू हा भाव सगळ्यांमध्ये येत आहे. आपण सगळे एकत्र आलो, तर आपल्याकडे पहाण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही.
शोभायात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत !

शोभायात्रेत अग्रभागी चौघडा रथ त्यापाठोपाठ जगदंब वाद्य पथक, बाल आणि युवा वारकर्यांचे पथक, पारंपरिक वेशातील महिला अन् मुख्य भगवान श्री परशुराम रथ सहभागी झाला होता. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. संपूर्ण शोभायात्रा मार्गावर रांगोळी आणि पायघड्या घालण्यात आल्या होत्या.