|
पणजी, २ मे (वार्ता.) – ‘बिट्स पिलानी’च्या गोवा संकुलातील वसतीगृहात विद्यार्थी कृष्णा कासेरा (मूळ लक्ष्मणपुरी, उत्तरप्रदेश) या २० वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ‘बिट्स पिलानी’च्या गोवा संकुलात मागील ५ मासांतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. कृष्णा कासेरा याच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देतांना ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने कोणती पावले उचलली ?’, याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थी कृष्णा कासेरा हा द्विपदवी योजनेच्या अंतर्गत ‘बिट्स पिलानी’च्या गोवा संकुलात शिक्षण घेत होता आणि आत्महत्या केल्याची घटना १ मे या दिवशी सकाळी १०.१५ वाजता उघडकीस आली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू या नात्याने घटनेची नोंद करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. ‘बिट्स पिलानी’च्या गोवा संकुलातील वसतीगृहात यापूर्वी ४ मार्च २०२५ या दिवशी एका २० वर्षीय विद्यार्थ्याने, तसेच १० डिसेंबर २०२४ या दिवशीही अशाच प्रकारे अन्य एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.