पाकिस्तानी आतंकवाद्यांना स्थानिकांनीही साहाय्य केल्याचेही उघड !
पहलगाम (जम्मू-काश्मीर) – येथील बैसरण भागात २२ एप्रिलला झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यानुसार पाकिस्तानमधील आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. यांनी मिळून हे आक्रमण घडवल्याचे समोर आले. याचा कट लष्कर-ए-तोयबाच्या पाकमधील मुख्यालयात आय.एस्.आय.च्या सांगण्यावरून रचला गेला. आक्रमणाच्या वेळी आतंकवादी पाकव्याप्त कश्मीरमधील प्रमुखांच्या संपर्कात होते. त्यांना पाकिस्तानमधून दिशानिर्देश दिले गेले आणि अर्थपुरवठाही करण्यात आला.
या आक्रमणात हाशिम मूसा आणि अली उपाख्य तल्हाभाई हे दोघे जण मुख्य आतंकवादी आहेत. दोघेही पाकिस्तानचे नागरिक असून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहेत. या दोघांना काश्मीरमध्ये रहाणार्या आदिल थोकर याने साहाय्य केले होते. पाकिस्तानी आतंकवाद्यांना स्थानिकांनीही साहाय्य केल्याचे समोर आले आहे.
संपादकीय भूमिकाभारताने कितीही अन्वेषण केले आणि कितीही पुरावे गोळा करून पाकला दिले, तरी पाक ते कधीही स्वीकारणार नाही, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. पुढे अशा प्रकारच्या अन्वेषणात वेळ घालवण्यापेक्षा ही समस्या कायमचीच संपवणे अपरिहार्य ठरले आहे ! |