परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. हृषीकेश विशाल पवार (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. हृषीकेश विशाल पवार हा या पिढीतील एक आहे !

४.५.२०२५ (वैशाख शुक्ल सप्तमी) या दिवशी जळगाव येथील बालसाधक कु. हृषीकेश विशाल पवार याचा ६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या आई-वडिलांनी दिलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

कु. हृषीकेश पवार

कु. हृषीकेश विशाल पवार याला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘वर्ष २०२० मध्ये ‘चि. हृषीकेश विशाल पवार महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२१.४.२०२५)   


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. श्री. विशाल रमेश पवार (कु. हृषीकेशचे वडील), जळगाव

१ अ. प्रेमळ स्वभाव : ‘मी प्रतिदिन कार्यालयातून घरी आल्यावर हृषीकेश मला ‘बाबा, तुमचे पाय दुखत आहेत का ?’, असे विचारतो. तो प्रतिदिन रात्री झोपतांना माझे पाय चेपून देतो.

१ आ. व्यष्टी साधनेचा आढावा देणे : मी माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांचा आढावा ‘ऑनलाईन’ देतो. तेव्हा हृषीकेशही त्याच्या साधनेचा आढावा देतो.

१ इ. सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांना ‘प.पू. डॉक्टर’, असे संबोधणे

१. वर्ष २०२३ मध्ये आमच्या घरी सदगुरु नंदकुमार जाधवकाका आणि श्री. वाघुळदेकाका (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे) आले होते. त्या वेळी हृषीकेश सद्गुरु जाधवकाकांना ‘प.पू. डाॅक्टर’, असे संबोधत होता. त्याला सांगूनही तो परत परत म्हणत होता, ‘‘हे सद्गुरु काका नाहीत, तर प.पू. डॉक्टरच आहेत.’’

२. वर्ष २०२३ मध्ये जळगाव सेवाकेंद्रात सद्गुरु जाधवकाकांचे मार्गदर्शन होते. त्या वेळी मला पुष्कळ खोकला येत होता. तेव्हा हृषीकेश मला सांगत होता, ‘‘बाबा, हळू खोका. प.पू. डॉक्टर बोलत आहेत.’’

१ ई. प.पू. डॉक्टरांना घेऊन जाण्यासाठी पिवळ्या रंगाच्या गाडीची मागणी करणारा बाल हृषीकेश ! : वर्ष २०२३ मध्ये मी हृषीकेशला शाळेत सोडायला जात असे. ‘शाळा ते घर’ या १५ मिनिटांच्या दुचाकी गाडीवरील प्रवासात तो मला वेगवेगळ्या वाहनांची माहिती विचारत असे. त्याला प्रतिदिन वेगवेगळ्या रंगांची चारचाकी वाहने दिसायची. एकदा तो मला म्हणाला, ‘‘बाबा, मला पिवळ्या रंगाची गाडी चालवायला हवी आहे. मी प.पू. डॉक्टरांना घेऊन त्या गाडीतून जाणार आहे.’’ (खरेतर हृषीकेशला ‘प.पू. डॉक्टर पूर्वी पिवळ्या रंगाची चारचाकी गाडी वापरत होते’, हे ठाऊक नाही, तसेच जळगावमध्ये आम्हाला एकही दिवस पिवळ्या रंगाचे चारचाकी वाहन दिसलेले नाही.)

१ उ. अनुभूती – शिर्डी येथे पहाटे साईबाबांच्या दर्शनाला गेल्यावर मूर्तीच्या स्थानी प.पू. डॉक्टरांचे दर्शन होऊन भाव जागृत होणे : वर्ष २०२३ मध्ये आम्ही देवदर्शनाला गेलो असतांना परतीच्या प्रवासात आमची नियोजित बस रहित झाल्याने आम्हाला शिर्डी मार्गाने जाणार्‍या एस्.टी.ने प्रवास करावा लागला. शिर्डी येथे पोचल्यावर आम्ही पहाटे साईबाबांच्या दर्शनाला गेलो. तेथे पहाटेची काकड आरती चालू होती. त्या वेळी मला साईबाबांच्या ठिकाणी प.पू. डॉक्टरच दिसत होते. आम्हा तिघांच्याही डोळ्यांतून घळाघळा अश्रू वहात होते. पत्नीने तिला तेथे ‘प.पू. डॉक्टर दिसत आहेत’, असे सांगितले. हृषीकेश भावस्थितीत असल्यामुळे एकदम शांत आणि स्थिर बसला होता. सर्व देवतांचे दर्शन घेऊन झाल्यावर ‘देवाने आम्हाला शेवटी गुरूंच्या दर्शनाला पाठवले आणि आयुष्याच्या प्रवासाचा शेवट गुरूंच्या चरणी आहे’, लक्षात आणून दिले.’

२. सौ. वैदेही विशाल पवार (कु. हृषीकेशची आई), जळगाव 

२ अ. खरे बोलणे : ‘हृषीकेश नेहमी खरे बोलतो. कधी त्याचे मित्र काही खोटे सांगत असतील, तर हृषीकेश जे घडले, तेच सांगतो.

२ आ. सात्त्विक व्यक्तींना हृषीकेश पुष्कळ आवडतो; पण ज्यांना आध्यात्मिक त्रास आहे, त्यांची हृषीकेशच्या सहवासात चिडचिड होते. 

२ इ. वर्ष २०२३ मध्ये झालेले सकारात्मक पालट 

१. वर्ष २०२३ पर्यंत हृषीकेशला विविध प्रकारचे त्रास होत; पण आता त्याला कोणतेही शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास होत नाहीत.

२. आम्हा पतीपत्नींना होणार्‍या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता आता न्यून झाली असून आमच्यामध्ये होणारे वादही आता अगदी न्यून झाले आहेत.’

– लिखाणाचा दिनांक (१.५.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck  मार्गिकेवरही पाहू शकता.

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक