कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळीच्या अस्ताला प्रारंभ !

जगमीत सिंह

कॅनडाच्या ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’चे नेते आणि खलिस्तान समर्थक जगमीत सिंह यांचा तेथील संघीय निवडणुकीत पराभव झाला आहे. सध्याचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाने २८ एप्रिल या दिवशी झालेल्या संघीय निवडणुकीत विजय मिळवला. जस्टिन ट्रुडो यांना पाठिंबा देणार्‍या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने भारताविरुद्ध प्रचंड गरळओक केली होती. ट्रुडो यांच्या कार्यकाळात भारत-कॅनडा संबंध अलीकडच्या सर्वांत खराब टप्प्यावर आले आहेत.

न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंह स्वतः ब्रिटीश कोलंबियातील बर्नाबी सेंट्रल येथून निवडणूक हरले आहेत. एवढेच नाही, तर त्यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही गमावला आहे. राष्ट्रीय पक्षाला किमान १२ जागा हव्या होत्या; पण त्यांना केवळ ७ जागा मिळाल्या. या दारुण पराभवाचे दायित्व स्वीकारत जगमीत सिंह यांनी पक्षाध्यक्ष पदाचे त्यागपत्र दिले आहे. जगमीत सिंह गेल्या ८ वर्षांपासून पक्षाचे प्रमुख होते.

खलिस्तानी चळवळीला धक्का

जगमीत सिंह यांच्या पक्षाचा दारुण पराभव कॅनडामधील खलिस्तानवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या पराभवामुळे भारत आणि कॅनडामधील राजनैतिक अन् व्यापारी संबंध पुन्हा स्थापित होण्यास साहाय्य होईल. अलीकडच्या काळात जगमीत सिंह आणि माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यातील युतीमुळे भारतासमवेतचे राजनैतिक संबंध बिघडले होते. त्यांच्या सरकारने खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोपही केला. एवढेच नाही, तर पंतप्रधान ट्रुडो यांनी वर्ष २०२० मध्ये भारतातील देशविरोधी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने विधान केले होते. असे करणारे ते जगातील एकमेव नेते होते.

जगमीत सिंह यांनी भारतावर केलेल्या टीकेमुळे त्यांना वर्ष २०१३ आणि वर्ष २०१८ मध्ये भारताने व्हिसा नाकारला. राजकीय कारणांमुळे भारतात प्रवेश करण्यास बंदी घातलेले ते पाश्चात्त्य देशातील पहिले खासदार असल्याचे बोलले जाते. भारताने ट्रुडो प्रशासनावर खलिस्तानवाद्यांविषयी मवाळ भूमिका स्वीकारल्याचा आरोपही केला होता. गेल्या काही वर्षांत सातत्याने कॅनडातील सार्वजनिक ठिकाणी भारतविरोधी घोषणा लिहिल्या जात आहेत, तसेच खलिस्तान्यांच्या कारवाया वाढत आहेत. आता नवीन परिस्थितीत खलिस्तानवादी चळवळीवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते, तसेच भारत-कॅनडा संबंध सुधारू शकतात, असे म्हटले जात आहे. (साभार : संकेतस्थळ)