पिंपरी (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून १८ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. १९ दिवसांचा प्रवास करून पायी पालखी सोहळा ६ जुलै या दिवशी पंढरीत दाखल होईल. ६ ते १० जुलै या कालावधीत पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी असेल. यंदा पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष आहे, अशी माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दिली. त्यांनी पालखी सोहळ्यासाठी ‘श्री संत तुकाराम संस्थान’च्या वतीने गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे यांची ‘पालखी सोहळा प्रमुख’ म्हणून घोषणा केली.
पालखी लोणी काळभोरनंतर दुपारी १ घंट्याच्या विश्रांतीसाठी शिंदवणे चौकात थांबेल. पालखीचे प्रस्थान १८ जूनला होणार असून पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असेल. १९ जूनला अनगडशहा बाबा दर्गा आणि चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबून संध्याकाळी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहील. २० आणि २१ जून या दिवशी पालखी पुण्यात नानपेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात, २२ जूनला लोणी काळभोर (कदम वाकवस्ती) येथे, २३ जूनला यवतच्या भैरवनाथ मंदिरात, २४ जूनला वरवंडच्या विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहील. १० जुलैला दुपारनंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला आरंभ करील. १२ दिवसांचा परतीचा प्रवास संपवून सोहळा श्री क्षेत्र देहूगाव येथे २१ जुलैला दुपारी पोचेल. तेथे सांगता होईल.