Bilawal Bhutto Zardari : पाकिस्तानचा इतिहास आतंकवादाशी जोडलेला !

संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यानंतर बिलावल भुट्टो झरदारी यांचीही स्वीकृती

इस्लामाबाद – पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनीही मान्य केले की, पाकिस्तानचा इतिहास आतंकवादाचा आहे. काही दिवसांपूर्वीच पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते की, अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांसाठी ३० वर्षांपर्यंत पाकने आतंकवाद्यांची निर्मिती केली होती.

ब्रिटीश वृत्तवाहिनी ‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, पाकिस्तानचा भूतकाळ आहे, ज्याचे परिणाम पाकिस्तानने भोगले आहेत. आपल्याला आतंकवादाचे एकामागून एक धक्के बसत आहेत; पण आपण ज्या काही संकटांमधून गेलो आहोत, त्यातून आपण एक धडाही घेतला आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी आपण अंतर्गत सुधारणा केल्या आहेत.

आतंकवादाविरुद्ध अमेरिका भारतासमवेत उभी आहे !

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी म्हटले आहे की, पहलगाम आतंकवादी आक्रमणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्प सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. अमेरिका भारत आणि पाकिस्तान यांच्या सरकारांशी सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

पहलगामच्या घटनेनंतर भारतीय प्रणालींवर १० लाख सायबर आक्रमणे

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने सांगितले की, पहलगाम येथील आक्रमणानंतर भारतीय प्रणालींवर १० लाख सायबर आक्रमणे झाली आहेत. भारतीय संकेतस्थळांना लक्ष्य करण्यात आले. बहुतेक हॅकिंग गटांनी स्वतः इस्लामी गट असल्याचे सांगितले.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानचे नेतेही पाकिस्तानला आतंकवादी म्हणत असतांना संयुक्त राष्ट्रे पाकला ‘आतंकवादी देश’ का घोषित करत नाहीत ?
  • केवळ इतिहास नाही, तर वर्तमानही असाच असून त्याचा भविष्य मात्र वाईट असणार आहे, हे पाकने लक्षात ठेवावे !