‘हाऊस अरेस्ट शो’ या कार्यक्रमावर तातडीने आळा घालण्याची आवश्यकता ! – आमदार चित्रा वाघ, महिला प्रदेशाध्यक्षा, भाजप

आमदार चित्रा वाघ

मुंबई – ‘एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट शो’मध्ये केवळ अश्लीलता आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळे रान मिळत आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमावर तातडीने आळा घालण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी ‘उल्लू ॲप’सहित अशा प्रकारचा आशय बनवणार्‍या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या,…

१. हा कार्यक्रम समाजाच्या मूल्यांवर आघात आहे.

२. स्वतःला अभिनेता म्हणवणार्‍या एजाज खानचा हा कार्यक्रम म्हणजे अश्लीलतेने गाठलेली परिसीमाच आहे.

३. ‘उल्लू ॲप’वरून प्रसारित होणारे व्हिडिओ अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांपर्यंत भ्रमणभाषच्या माध्यमातून अशा प्रकारचा आशय सहज पोचतो. त्यामुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होण्याची भीती आहे.

४. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून केवळ संस्कृतीची अवहेलना होत नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना होत आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे.