ॐ Shiva–Shakti ॐ Puraskaram – 2025 : विश्वकल्याणासाठी अव्याहतपणे कार्यरत असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा ‘ॐ  शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मान !

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पुरस्कार प्रदान करतांना ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य

कण्णूर (केरळ) : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी तथा विश्वकल्याणासाठी महर्षींच्या आज्ञेने देश-विदेशांत लाखो किलोमीटर भ्रमंती करणार्‍या, तहान-भूक, उन-पाऊस यांची तमा न बाळगता धर्मप्रसार करणार्‍या आणि सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘ॐ  शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

‘ॐ  शिव शक्ति ॐ’ पुरस्काराचे सन्मान चिन्ह

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी हे ‘सनातन एलम वास्तूरत्न’चे कुलपती असलेले ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य होते, तर सन्माननीय अतिथी म्हणून ‘कृष्णा बिच रिसॉर्ट’च्या ‘शिवोहम् स्पिरिच्युअल वेलनेस सेंटर’च्या मुख्य चिकित्सक डॉ. ज्योती शमिथ यांना निमंत्रित करण्यात आले होते.

ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना हा पुरस्कार प्रदान केला. डॉ. ज्योती शमिथ यांनी प्रमाणपत्र देऊन, तर सौ. सुधा रविंद्रनाथ यांनी पोनाडा (दक्षिण भारतात देण्यात येणारी एकप्रकारची शाल) प्रदान करून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान केला. या वेळी तमिळनाडू येथील गुडालूर येथील चिंतामणी वाघेश्वरी मुकंबिका मंदिराच्या मठाधिपती प.पू. डॉ. ब्रह्म योगिनी श्री श्री श्री माता अंबिका चैतन्यमयी यांनाही ‘ॐ  शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘शिवोहम् स्पिरिच्युअल वेलनेस सेंटर’चे संस्थापक डॉ. सी.व्ही. रविंद्रनाथ यांनी जाहीर केला होता.

स्वतःतील आंतरिक शक्ती, दृढ निश्चय आणि कृपाशीर्वाद यांद्वारे नेतृत्व करून दिशादर्शन करणार्‍या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो.