छत्रपती संभाजीनगर येथे गौरव झालेल्या पोलीस निरीक्षकांवर दुसर्‍या दिवशी विनयभंगाचा गुन्हा नोंद !

महिला शिपायाची तक्रार !

छत्रपती संभाजीनगर – वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांना उत्कृष्ट सेवेसाठी २८ एप्रिल या दिवशी पोलीस महासंचालक पदक घोषित झाले; पण लगेचच २९ एप्रिल या दिवशी एका महिला शिपायाला व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह संदेश आणि छायाचित्र पाठवल्यामुळे भंडारे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनी हा संदेश ९ एप्रिल या दिवशी रात्री पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘हा गुन्हा द्वेषभावना आणि गैरसमजातून झाला आहे’, असे भंडारे यांचे म्हणणे आहे.

पोलीस मुख्यालयात ३४ वर्षांच्या तक्रारदार शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ९ एप्रिल या दिवशी रात्री घरी असतांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका क्रमांकावरून कॉल आला. क्रमांक संग्रही नसल्याने त्यांनी ‘कौन?’ असा मेसेज पाठवला. त्यावर अधिकार्‍याने स्वतःचे छायाचित्र पाठवले आणि लगेच डिलिट (काढले) केले. त्यावर त्यांनी पुन्हा ‘कौन ?’ अशी विचारणा केली. त्यावर अधिकार्‍याने आक्षेपार्ह संदेश पाठवला. या प्रकरणी २९ एप्रिल या दिवशी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

संपादकीय भूमिका :

पोलीस अधिकार्‍याचे वर्तन कसे आहे ? हे पोलीस खात्याला ठाऊक नव्हते कि कुणाच्या दबावाखाली त्यांना पदक घोषित केले, हे पहाणे आवश्यक आहे. आपल्याच खात्यातील महिलांशी गैरवर्तन करणारे पोलीस समाजातील महिलांचे कधीतरी रक्षण करू शकतील का ? अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !