नालेस्वच्छतेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मुंबई महापालिका सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे लक्ष ठेवणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – मुंबईमध्ये नालेस्वच्छतेच्या कामात भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी मुंबईतील छोट्या-मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेमध्ये ‘वॉर रूम’ निर्माण करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या संकल्पनेतून ही कार्यवाही चालू करण्यात आली आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ने नालेस्वच्छतेमधील भ्रष्टाचार केला उघड !

काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’ने मुंबईतील नालेस्वच्छतेच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मालाड (पूर्व) येथील प्रतापनगरमधील एका छोट्या नाल्यातील गाळ १ ते २ दिवसांत काढून होण्यासारखा असतांना १५ दिवस गाळ काढण्याचे काम चालू होते. आधीच मातीने भरून येणार्‍या डंपरमध्ये वरवर गाळ ठेवून गाळाचे अधिक डंपर दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार चालू होता. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्याचे चित्रीकरण करून याविषयीची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या ‘एक्स’ खात्यावर पाठवली होती, तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यापर्यंतही पोचवली होती. या वृत्तामध्ये नालेस्वच्छतेच्या कामातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ठोस कार्यवाही करण्याचे आवाहन केले होते.

सकाळी ८ ते रात्री १ वाजेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे नालेस्वच्छतेचे काम पाहिले जाणार आहे. नालेस्वच्छता करण्यापूर्वीचे आणि झाल्यानंतरचे चित्रीकरण ठेकेदारांनी महानगरपालिका प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिकेमध्ये नाले स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक सिद्ध करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका :

नाले स्वच्छतेसारख्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही, हेही पहाणे आवश्यक !