पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षा’चे उद्घाटन १ मे या दिवशी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

१ मे या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ‘एआय’ प्रणालीचा शुभारंभ कार्यक्रम आणि नंतर मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन झाले. कक्षाच्या उद्घाटनाच्या वेळी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, तसेच कक्षातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून चालू करण्यात आलेल्या या कक्षामुळे सिंधदुर्ग जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवरच वैद्यकीय साहाय्यासाठी साहाय्य मिळणार आहे. कक्षात नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी संवेदनशीलतेने अन् तत्परतेने कार्य करावे.’’

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाचा उद्देश
समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मदाय रुग्णालयांतर्गत विनामूल्य उपचार मिळवून देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेसह इतर योजनांची माहिती आणि सुविधा रुग्णांना मिळवून देणे, तसेच योजनेच्या बाहेर असलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधी अंतर्गत साहाय्य पुरवणे हे या कक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.